लोन अँपच्या जाळ्यात अडकवून तरुणीकडून उकळले 7.60 लाखाची रक्कम मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला केले ब्लॅकमेल

लोन अँपच्या जाळ्यात अडकवून तरुणीकडून उकळले 7.60 लाखाची रक्कम   मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीला केले ब्लॅकमेल
Published on: 

लोन ॲपद्वारे उच्चशिक्षित तरुणीला गंडा
७.६० लाखांची फसवणूक; मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : अनधिकृत लोन ॲपद्वारे कर्ज घेणे एका २३ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. लोन ॲप चालकांनी या तरुणीचे अश्लील मॉर्फ केलेले फोटो समाजमाध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तब्बल सात लाख ६० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील २३ वर्षीय तरुणी कोपरखैरणेत राहण्यास असून, ती महापे येथील एका फार्मास्युटिकल्स कंपनीत नोकरीस आहे. २० जुलै रोजी या तरुणीला तातडीने पैशांची गरज होती. त्यामुळे तिने गुगलवरून ध्रुव लोन ॲप डाऊनलोड केले होते. या वेळी तिच्या मोबाईलमध्ये फर्टिला रूपी नावाचे दुसरे लोन ॲप इन्स्टॉल झाले. याद्वारे तरुणीने सुरुवातीला पाच हजारांच्या कर्जाची मागणी केली असता, तिच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले. ही रक्कम तिने एका आठवड्यात व्याजासह परत केली, मात्र त्यानंतर तरुणीने नवीन कर्ज मागितले नसताना, सायबर चोरट्यांनी तरुणीच्या खात्यात पैसे पाठवून तिला ते पुन्हा भरण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली. १५ ते २० दिवस हा प्रकार असाच सुरू राहिला. ३० जुलै रोजी तरुणीने ती रक्कम भरण्यास नकार दिला. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेज करून तिला धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच, आरोपींनी या तरुणीचे मॉर्फ अश्लील फोटो तिला पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे या तरुणीने मित्र परिवाराकडून पैसे जुळवून आरोपींनी सांगितलेल्या विविध खात्यांवर २३ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर या कालावधीत सात लाख ६० हजार रुपये पाठवले. अखेर आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांचे महत्त्वपूर्ण आवाहन
कोणत्याही अनधिकृत किंवा प्ले स्टोअरवरील बनावट लोन ॲपच्या जाळ्यात अडकू नका. लोन ॲप इन्स्टॉल करताना मोबाईलमधील वैयक्तिक फोटो, कॉन्टॅक्ट्स आणि लोकेशनची परवानगी चुकूनही देऊ नका. अशा प्रकारच्या ब्लॅकमेलिंगला न घाबरता तत्काळ नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनवर किंवा स्थानिक पोलिसांकडे संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com