गौण खनिजासाठी ४४ बनावट परवाने

गौण खनिजासाठी ४४ बनावट परवाने
Published on: 

गौण खनिजासाठी ४४ बनावट परवाने
तुर्भेतील आरएमसी प्लांटवर छापा; रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने तब्बल ४४ बनावट परवाने तयार करून शासनाची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार तुर्भे एमआयडीसीत उघडकीस आला आहे. बोनसरी येथील एका रेडी मिक्स काँक्रीट प्लांटवर केलेल्या संयुक्त तपासणीदरम्यान हा प्रकार समोर आला. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी चालकासह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे.
तुर्भे एमआयडीसी परिसरात गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बनावट परवान्यांचा वापर करून शासनाची फसवणूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने २१ ऑगस्टला तपासणी केली. या वेळी बोनसरी येथील मे. टी.एन.ए. आरएमसी इंडिया प्रा. लि. या प्लांटवर खडी खाली करण्यासाठी आलेल्या डम्परमध्ये सुमारे सहा ब्रास खडी आढळली. मात्र, चालक श्याम पुजारी (३८) याच्याकडे वाहतुकीचा वैध परवाना नव्हता. कागदपत्रांची तपासणी केली. दरम्यान, याप्रकरणी बेलापूर महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मोहन बोंबे यांनी तुर्भे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, श्याम पुजारी आणि बनावट परवाने तयार करण्यात सहभागी असलेल्या संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट परवाने कोणी तयार केले, त्यांचा वापर किती काळापासून सुरू होता आणि या प्रकारामागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.

विविध जिल्ह्यांच्या नावाने परवाने
विविध जिल्ह्यांच्या नावाने तयार केलेले परवाने आढळले. त्यापैकी ठाणे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांशी संबंधित परवाने वैध असल्याचे स्पष्ट झाले; मात्र रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाने असलेल्या ४४ परवान्यांच्या वैधतेबाबत संशय निर्माण झाला. हे परवाने महाखनिज प्रणालीवर उपलब्ध नसल्याने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांची पडताळणी करण्यात आली. ७ सप्टेंबरला सादर केलेल्या अहवालात हे परवाने कार्यालयाकडून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com