

कळंबोलीत अपघातात दोघांचा मृत्यू
टम्पोच्या धकेत एक गंभीर जखमी
पनवेल, ता. २८ (वार्ताहर) : कळंबोली येथे खासगी बसमधून उतरल्यानंतर त्याच बसमधून सामान काढताना दाम्पत्यासह बसच्या क्लीनरला भरधाव टेम्पोने धडक दिली. ही दुर्घटना बुधवारी (ता. २८) पहाटे कळंबोली येथे घडली. या अपघातात संगीता मोटे आणि बसचा क्लीनर बाळू सरताते यांचा मृत्यू झाला. तर संगीता यांचे पती पोपट मोटे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळंबोली पोलिसांनी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
या अपघातातील गंभीर जखमी पोपट मोटे (वय ५०) हे कळंबोली सेक्टर-१ ई मधील एलआयजी वसाहतीत कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वीच ते पत्नी संगीता यांच्यासह सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील मूळ गावी गेले होते. मोटे दाम्पत्याने कळंबोली येथे येण्यासाठी मंगळवारी रात्री ट्रव्हल्सची बस पकडली. बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ही बस कळंबोली येथे आल्यानंतर चालकाने कळंबोली सर्कलच्या पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीएनजी पंपाजवळ बस थांबवली. त्यानंतर मोटे दाम्पत्य आणि बसचा क्लीनर बाळू सरताते हे सामान काढण्यासाठी खाली उतरले. या वेळी ते बस आणि फुटपाथ यांच्यामधील जागेत सामान काढत असताना कळंबोली सर्कलकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो बस आणि फुटपाथ यांच्यामधील जागेत घुसला. त्यामुळे सामान काढत असलेल्या तिघांना टेम्पोची जोरदार धडक बसली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. संगीता मोटे आणि क्लीनर बाळू सरताते यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी संगीता आणि बाळू यांना मृत घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोपट मोटे यांना सुश्रुत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळंबोली पोलिसांनी टेम्पोचालक इफतेखार अहमद अब्दुल रेहमान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.