

पनवेलमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला जन्मठेप!
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह सहा वर्षांच्या मुलीची हत्या
पनवेल, ता. ३ (वार्ताहर) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची आणि स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केल्यानंतर तब्बल चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. श्रीमंत नागरगोजे असे आरोपीचे नाव असून, या हत्याकांडानंतर त्याने स्वतःची ओळख बदलून गोव्यात आश्रय घेतला होता. पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने त्याला २०२०मध्ये गोव्यातून बेड्या ठोकल्या होत्या. २०१६ मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण पनवेल, उरण परिसर हादरून गेला होता.
श्रीमंत नागरगोजे हा मूळचा सातारा जिल्ह्यातील असून, तो ट्रेलरचालक म्हणून काम करीत होता. श्रीमंत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यावरून दोघांमध्ये वादही होत होते. घटनेच्या दिवशी तो जेजुरी येथून स्वतःच्या ट्रेलरमधून पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीला घेऊन पनवेल येथे आला. येथे त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि सहा वर्षांची मुलगी हत्येची साक्षीदार ठरू शकते, या भीतीने आरोपीने तिचाही ओढणीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह उरण परिसरातील निर्जन ठिकाणी फेकून तो पसार झाला.
पनवेल शहर पोलिस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती, तर जेजुरी पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले होते. तपास पथकाने विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास करून आरोपीचा शोध सुरू घेतला असता, श्रीमंत गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो स्वतःची ओळख बदलून श्रीपाल यादव या नावाने गोव्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत असल्याचे आढळून आले. त्याला अटक करून पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी आरोपीला दोषी ठरवले आणि जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, सात वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर कलम ४७१ अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा व दोन हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंडाच्या रकमेपैकी ५० हजार रुपये फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.