

बचत गट निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल
एक लाख तीन हजारांहून अधिक नवीन महिला बचत गटांची स्थापना
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने सेवा संकल्प अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात एक लाख तीन हजार २०९ नवीन महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यात १० लाखांहून अधिक ग्रामीण महिलांचा सहभाग वाढला आहे. विशेष म्हणजे, सेवा संकल्प अभियानाच्या कालावधीत देशात सर्वाधिक बचत गट स्थापन करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे, अशी माहिती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी दिली.
नव्याने स्थापन झालेल्या बचत गटांपैकी ७८ हजार ५४५ गटांची लोकोस या डिजिटल प्रणालीवर नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गटांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. अभियानांतर्गत एक लाख पाच हजार ३७१ नवीन बचत गट स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जवळपास उद्दिष्टपूर्ती करण्यात उमेद अभियानाला यश आले आहे.
राज्य स्तरापासून गावपातळीपर्यंत अधिकारी, कर्मचारी आणि क्षेत्रीय यंत्रणेने केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळविला. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना संघटित होऊन आर्थिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, देशात सहा कोटी लखपती दीदी घडविण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात एक कोटी लखपती दीदी घडविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. नव्याने स्थापन झालेले बचत गट या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
सेवा संकल्प अभियानामुळे राज्यातील बचत गट चळवळीला बळ मिळण्यासह ग्रामीण महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळेल, असा विश्वास श्रीधर डुबे पाटील यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.