

सिडकोच्या फ्लॅटचे प्रलोभन दाखवून कोटींचा गंडा
खारघर पोलिसांकडून पाच जणांविरोधात गुन्हा
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : सिडकोच्या मास हाउसिंग योजनेतील फ्लॅट स्वस्त दरात मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने खारघरमधील एका कुटुंबाची एक कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या टोळीने सिडकोच्या नावाने बनावट अलॉटमेंट लेटर आणि नोंदणीकृत कागदपत्रे तयार करुन सदर रक्कम उकळली. खारघर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या टोळीने अशाच पद्धतीने अन्य नागरिकांचीही कोटयवधी रुपयांची फसवणूक केली आहे.
तक्रारदार सत्यपाल शर्मा (५८) हे खारघरमध्ये राहण्यास असून, त्यांची फसवणूक करणारे कृष्णकान्त गौर, त्याची पत्नी लीना गौर आणि मुलगा अक्षत गौर हे तेथेच राहतात. ओळखीचा फायदा घेत जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी सिडकोने सवलतीच्या दरातील फ्लॅटची योजना जाहिर केल्याचे सांगितले. तसेच स्वतःच्या नावावरील सिडकोचे बनावट अलॉटमेंट लेटर आणि नोंदणीकृत कागदपत्रेही दाखवली. तसेच नेरुळमधील योगेश आणि आनंद दुसानकर हे सिडकोच्या कामात भागीदार असल्याचे सांगून शर्मा यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी शर्मा यांच्या मुलींच्या नावावर सिडकोच्या खारघर येथील सेलिब्रेशन या मास हाउसिंग योजनेतील तीन फ्लॅट मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. फ्लॅटच्या व्यवहारासाठी आरोपींनी वेगवेगळ्या टप्प्यांवर शर्मा यांच्याकडून रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट आणि ऑनलाइन माध्यमातून एकूण एक कोटी ६० लाख रुपये घेतले. तसेच या तिन्ही फ्लॅटचे सिडकोचे बनावट अलॉटमेंट लेटर त्यांना दिले, मात्र फ्लॅट मिळत नसल्याने शर्मा यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर १५ सफ्टेंबरला मुख्य आरोपी कृष्णकान्त गौर याने शर्मा यांना दिलेली सिडकोची फ्लॅट संदर्भातीळ कागदपत्रे, शिक्के आणि अलॉटमेंट लेटर बनावट व अनधिकृत असल्याचे कबूल केले. तसेच एक कोटी १० लाख रुपये परत करण्याची जबाबदारी स्वीकारून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीसमोर शपथपत्र करून दिले. त्यानंतर आरोपी गौर व त्याच्या कुटुंबीयांनी शर्मा यांना पैसे परत न करता पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मागितल्यानंतर आनंद दुसानकर याने नेरूळ येथील एल. पी. ब्रिजजवळ शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या टोळीने रामफल शर्मा यांची ८२ लाख रुपये, जितेंद्र पंडित यांची एक कोटी रुपये, रामगोपाल यांची ८० लाख रुपये, तर पवन त्रिपाठी यांची ३३ लाख रुपयांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार खारघर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.