दहशतवादी हल्ल्याचा थरार! एनएसजी कमांडोंनी केला आठ डमी दहशतवाद्यांचा खात्मा रिलायन्स कॉर्पोरेट पार्क आणि आरबीआयमध्ये मध्यरात्रीपर्यंत मॉकड्रिल; दोन ठिकाणी आयईडी निकामी करण्याचे प्रात्यक्षिक

दहशतवादी हल्ल्याचा थरार! एनएसजी कमांडोंनी केला आठ डमी दहशतवाद्यांचा खात्मा   रिलायन्स कॉर्पोरेट पार्क आणि आरबीआयमध्ये मध्यरात्रीपर्यंत मॉकड्रिल;   दोन ठिकाणी आयईडी निकामी करण्याचे प्रात्यक्षिक
Published on: 

नवी मुंबईत सुरक्षा सज्जतेची तपासणी
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : दहशतवादी हल्ल्याच्या आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांची सज्जता आणि परस्पर समन्वय तपासण्यासाठी नुकतेच एनएसजी मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मॉक ड्रिल पार पडले. घणसोलीतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क आणि सीबीडी बेलापूर येथील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात हा सराव पार पडला. यामध्ये एनएसजी कमांडोंनी आठ काल्पनिक दहशतवाद्यांना निष्प्रभ केले, तर दोन ठिकाणचे आयईडी निकामी करण्याचे प्रात्यक्षिकही केले.
दोन्ही ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून सुरक्षा यंत्रणांच्या प्रतिसादाची चाचणी घेण्यात आली. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह जलद प्रतिसाद पथक आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत संयुक्तपणे परिस्थिती हाताळण्याचा सराव केला.
या मोहिमेत एनएसजी, क्यूआरटी, सीआयएसएफ, स्थानिक पोलिस, सुरक्षा शाखा, बीडीडीएस, एटीएस, अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण ६४ पोलिस अधिकारी आणि ३८९ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला. एनएसजीचे आठ अधिकारी आणि ५३ कमांडोंनी सरावाचे नेतृत्व केले.
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. या सरावातून विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय, आपत्कालीन निर्णयक्षमता आणि दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी तपासण्यात आली.