सिडकोच्या भूखंडांचा लेखा-जोखा

सिडकोच्या भूखंडांचा लेखा-जोखा
Published on: 

नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : नवी मुंबई क्षेत्रातील जमिनींचे प्रभावी व्यवस्थापन आणि प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी सिडकोने एक व्यापक पाऊल उचलले आहे. नवी मुंबई परिसरातील विकलेल्या तसेच न विकलेल्या सर्व भूखंडांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्वेक्षण, मोजणी आणि संपूर्ण माहितीचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय सिडको व्यवस्थापनाने घेतला आहे.

या सर्वेक्षणाच्या माध्यमातून सिडकोने आतापर्यंत वाटप केलेले भूखंड संबंधित भूधारकांनी विकसित केले आहेत की नाही, भूखंडधारकांनी सीसी, ओसी घेतली आहे की नाही, तसेच सिडकोने वाटप न केलेल्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करण्यात आले आहे का, आले असल्यास त्या अतिक्रमणाची व्याप्ती किती आहे, या सर्व बाबींची अद्ययावत माहिती सिडकोकडे उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच मोकळ्या राहिलेल्या भूखंडांपैकी किती भूखंड सामाजिक उपक्रमासाठी व किती भूखंड वाणिज्य उपयोगात येऊ शकतील, याचा तपशील सिडकोला भविष्यात उपयोगी पडणार आहे. या कामासाठी सिडकोने मुंबईतील पायोनियर फाउंडेशन या संस्थेची अधिकृत एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. हे सर्वेक्षण मोहीम एप्रिल २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे. हे सर्वेक्षण ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी बेलापूर, खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, उलवे, द्रोणागिरी, तळोजा, करंजाडे आणि पुष्पक नगर या प्रमुख नोड्समध्ये राबवले जाणार आहे.

स्वतंत्र अहवाल तयार करणार
भूखंड वाटप पत्र, ताबा पत्र, प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी), भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) आणि विकास करारांसारख्या सर्व संबंधित कागदपत्रांची सिडकोच्या दफ्तरांशी पडताळणी केली जाणार आहे. यात काही तफावत आढळल्यास स्वतंत्र अहवाल तयार करून संपूर्ण माहितीचा एक सुरक्षित आणि अद्ययावत डिजिटल डेटाबेस या माध्यमातून तयार केला जाणार असल्याचे मुद्गल यांनी सांगितले.

या प्रकल्पांतर्गत एजन्सीचे प्रतिनिधी सिडकोच्या नियोजन विभागाकडून ऑटोकॅड नकाशे व नोडल आराखडे घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी भूखंडांची पाहणी करतील. यामध्ये प्रत्येक भूखंडाचे अंतर्गत व बाह्य मोजमाप, सद्य:स्थितीतील बांधकामांचे डिजिटल छायाचित्रीकरण आणि प्रत्यक्ष विकास स्थितीची नोंद केली जाणार आहे.
- अश्विन मुद्गल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको