

लग्नासाठी ऑनलाइन वर शोधणे पडले महागात
उरणमधील तरुणीला साडेपाच लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : विवाहासाठी योग्य जोडीदार ऑनलाइन शोधाणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. उरणमधील एका ३० वर्षीय तरुणीला मॅट्रिमोनिअल साईटवरून संपर्क साधून सायबर भामट्यांनी तब्बल पाच लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने सप्टेंबर महिन्यात एका विवाहविषयक संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती. याचदरम्यान सायबर भामट्याने अविराज देशपांडे नावाने या तरुणीशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला. आपण यूकेमध्ये राहत असल्याचे सांगत त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. तसेच, ६ ऑक्टोबरला भारतात येत असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्ली विमानतळावरील कस्टम अधिकारी असल्याचे भासवणाऱ्या कृतीका राय नामक व्यक्तीने तरुणीला संपर्क साधला आणि अविराज देशपांडे याच्याकडे यूकेमधून दोन लाख पौंडचा डिमांड ड्राफ्ट असून, त्याच्या नोंदणीसाठी ५५ हजार ५०० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानुसार तरुणीने पैसे पाठवले. त्यानंतर या भामट्यांनी ॲण्टी मनी लाँड्रिंग प्रमाणपत्र, फॉरेन एक्स्चेंज क्लिअरन्स, कायदेशीर मालकी हस्तांतरण, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, करन्सी डिक्लेरेशन आणि विलंब शुल्क अशा वेगवेगळी कारणे सांगून तरुणीकडून पैसे उकळले. त्यानंतर अविराजने २५ हजार डॉलरचे रोख रकमेचे पार्सल पाठविले असून, ते जम्मू-काश्मीर विमानतळावर कस्टम विभागाने पकडल्याचा बनाव केला.
त्यानंतर गुरसेल नावाच्या व्यक्तीने या तरुणीला संपर्क साधून विविध प्रमाणपत्रे शुल्काच्या नावाखाली तरुणीला पैसे भरण्यास सांगितले. लग्नाच्या भूलथापा आणि परदेशातून मोठी रक्कम मिळणार असल्याच्या प्रलोभनांना बळी पडलेल्या तरुणीने वेळोवेळी पैसे पाठवले. पैसे पाठविल्यानंतरदेखील पार्सल मिळत नसल्याने तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.