

पावणेचार लाख ग्राहकांचा डेटा ‘लीक’
एसबीआयच्या सर्व्हर हॅकप्रकरणी नवी मुंबईत गुन्हा
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत माेठ्या भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) माहिती सुरक्षा व्यवस्थेला सायबर चोरट्यांनी लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर ११ येथील बँकेच्या ग्लोबल आयटी सेंटरच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी करून हॅकर्सनी तब्बल तीन लाख ७५ हजार ग्राहकांचा डेटा चोरून तो डार्क वेबवर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात अनाेळखी हॅकर्सविरोधात गुरुवारी (ता. १२) विविध कलम आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टेट बँकेच्या महत्त्वाच्या डिजिटल यंत्रणेतील या माहिती चोरीमुळे देशभरातील ग्राहकांच्या आर्थिक आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सायबर चोरट्यांनी युनो २.० आणि रास (आरएएएस) या महत्त्वाच्या ॲप्लिकेशन्समध्ये घुसखाेरी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल आयटी सेंटरच्या सर्व्हरमध्ये ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.१३ वाजता अनाेळखी व्यक्तींनी ‘सिरीअसीम’ या नावाने अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर हार्कर्सने १५ ऑक्टोबरला सायंकाळी ६च्या सुमारास एसबीआय बँकेच्या डिजिटल यंत्रणेतील महत्त्वाचा डेटा चोरला. १६ ऑक्टोबरला आयटी सेंटरच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर केलेल्या तपासणीत ग्राहकांचा डेटा चोरून हा डेटा डार्क वेबवर प्रसारित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर एसबीआय बँकेच्या ग्लोबल आयटी सेंटरमधील अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सीबीडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार अनाेळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२),६९(२), माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ४३(अ),४३(ब),४३(क), ६६,६६(सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरीला गेलेल्या डेटाचे स्वरूप आणि त्यात ग्राहकांची नेमकी कोणती संवेदनशील माहिती आहे, चोरीला गेलेल्या डेटाचा गैरवापर झाला आहे का, त्यामागे नेमके कोणते हॅकर नेटवर्क कार्यरत आहे आणि या प्रकारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
----
काय चाेरीला गेले?
- सायबर हल्ल्यात एसबीआयच्या युनो २.० आणि रास ॲप्लिकेशनशी संबंधित सुमारे ३२ सीएसव्ही फाइल्समधील तीन लाख ७५ हजार रेकॉर्ड्सची चोरी केली.
- हॅकर्सने दोन जेएसओएन फाइल्स आणि दाेन हजार ७२१ पीडीएफ फाइल चोरल्याचे तपासणीत उघडकीस आले आहे. या पीडीएफ फाइलमध्ये दाेन हजार ६३ युनिक हॅश पीडीएफ फाइल्स आणि ६५८ डुप्लिकेट फाइल्स आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.