आयुर्वेदिक उत्पादनांच्या नावाखाली 9 हजार जणांना गंडा घालण्याचा डाव अर्थवर्धनच्या मालकासह चौघांना अटक पोलिसांनी डमी ग्राहक बनून उघड केला बेकायदा मनी सर्क्युलेशनचा प्रकार

आयुर्वेदिक उत्पादनांच्या नावाखाली 9 हजार जणांना गंडा घालण्याचा डाव अर्थवर्धनच्या मालकासह चौघांना अटक   पोलिसांनी डमी ग्राहक बनून उघड केला बेकायदा मनी सर्क्युलेशनचा प्रकार
Published on: 

आयुर्वेदिक उत्पादनांच्या नावाखाली नऊ हजार जणांना गंडा?
अर्थवर्धनच्या मालकासह चौघांना अटक
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : आयुर्वेदिक उत्पादनांच्या विक्रीच्या आड बेकायदा मल्टिलेव्हल मार्केटिंग आणि मनी सर्क्युलेशन योजनेद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक करण्याचा मोठा डाव नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुप्तवार्ता पथकाने उधळून लावला आहे. अर्थवर्धन हेल्थ ॲण्ड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या कथित रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी कंपनीचा मालक तथा संचालक महादेव काकडे याच्यासह चार जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी स्वतः डमी ग्राहक बनून या योजनेत प्रवेश करत फसवणुकीचे पक्के पुरावे गोळा केले. या प्रकरणात पोलिसांनी २६ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, कंपनीचे तब्बल नऊ हजार ऑनलाइन आयडी तपासात आढळले आहेत.
अर्थवर्धन हेल्थ ॲण्ड वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडबाबत माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुप्तवार्ता युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज किरण गोरे आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. आरोपींच्या कामकाजाची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बातमीदाराच्या माध्यमातून प्रदीप शार्दुल याच्याशी संपर्क साधला. सानपाडा येथील हॉटेल सनराईज रेसिडेन्सी येथे झालेल्या भेटीत आरोपीने स्वतः कंपनीची आर्थिक योजना कागदावर लिहून समजावून सांगितली. यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक म्हणून पाच हजार रुपये यूपीआयद्वारे कंपनीच्या खात्यावर जमा केले. त्याबदल्यात कंपनीकडून ए-२७०३८ हा ऑनलाइन आयडी तयार करून घेण्यात आला. या प्रत्यक्ष व्यवहारातून योजनेचे स्वरुप स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन कार आणि मोठ्या प्रमाणातील आयुर्वेदिक उत्पादनांचा तब्बल २६ लाख ३६ हजार ५०० रुपये किमंतीचा साठा जप्त केला आहे. आर्थिक गुप्तवार्ता पथकाच्या प्राथमिक तपासात कंपनीचे तब्बल नऊ हजार ऑनलाइन आयडी आढळून आले आहेत. त्यामुळे या योजनेचे जाळे राज्यातील विविध भागांत पसरले असण्याची शक्यता असून, या आयडींच्या माध्यमातून किती जणांकडून पैसे स्वीकारण्यात आले, याचा पोलिस तपास करत आहेत. नऊ हजार आयडी आढळले असले तरी प्रत्यक्ष फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या आणि आर्थिक व्यवहारांची व्याप्ती तपासानंतर स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात कंपनीचा मालक महादेव काकडे (रा. येवला, नाशिक), एजंट प्रदीप शार्दूल, संतोष आरवेल आणि ओमप्रकाश गुप्ता या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा एपीएमसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

अशी होती भामट्यांची कार्यपद्धती
पाच हजारांत दोन उत्पादने : कोणत्याही आवश्यक कायदेशीर परवानग्या नसताना प्री-लॉन्चिंगच्या नावाखाली अर्थवर्धन कंपनीकडून ही योजना राबवली जात होती. प्रत्येक सदस्याकडून पाच हजार रुपये स्वीकारून त्या बदल्यात प्रत्येकी अडीच हजार रुपये एमआरपीची दोन आयुर्वेदिक उत्पादने दिली जात होती.
अवास्तव नफ्याचे प्रलोभन : त्यानंतर नवीन सदस्य जोडण्याच्या माध्यमातून बायनरी आणि लेव्हल इन्कमच्या नावाखाली दररोज २० हजार रुपये म्हणजेच महिन्याला सहा लाख रुपयांपर्यंत कमाई होण्याचे प्रलोभन दाखवले जात होते.
विनाकामाचे प्रलोभन : कोणतेही काम न करता किंवा नवीन सदस्य न जोडता केवळ दर आठवड्याला ठरावीक रक्कम भरल्यास १४ महिन्यांत एक लाख चार हजार रुपयांपर्यंत परतावा मिळेल, असेही सांगितले जात होते. या अवास्तव परताव्याच्या आमिषातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याची योजना आखण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.