

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सुरू असलेल्या ‘समरसता श्री गणेश’ उत्सवात देहविक्रीच्या व्यवसायाशी संबंधित महिलांनी गणेश पूजन, महाआरती आणि महाप्रसादात सहभाग घेतला. सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी या महिलांना गणेशोत्सवात आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित महिलांनी भक्तिभावाने गणेशाची आरती केली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानाचे रक्षण करणे ही मानवतेची महत्त्वाची शिकवण असून, गणेशाच्या दरबारात कोणताही भेदभाव नसावा, अशी भावना सुनील देवधर यांनी व्यक्त केली.
सुनील देवधर यांनी दिल्लीत २०२१ पासून ‘समरसता श्री गणेश’ उत्सवाची सुरुवात केल्याचे वृत्त आहे. समाजातील विविध धर्म, पंथ आणि उपेक्षित घटकांना या उत्सवाच्या माध्यमातून गणेश पूजेत सहभागी करून घेण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
यंदाच्या उत्सवात यापूर्वी शीख समाजातील नागरिक तसेच नवी दिल्ली महानगरपालिकेच्या (NDMC) स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गणेशाची आरती व पूजन केले आहे.
आगामी काळात मुस्लिम, ख्रिश्चन, जैन समाजातील नागरिक, बौद्ध भंते, दलित समाजातील प्रतिनिधी, तृतीयपंथी, दिव्यांग व्यक्ती, बालगृहातील मुले, मुख्य प्रवाहात परतलेले माजी नक्षलवादी, चकमा समुदाय, ईशान्य भारतातील विद्यार्थी तसेच वेदपाठशाळेतील विद्यार्थी यांनाही उत्सवात सहभागी करून घेण्याचे नियोजन असल्याचे वृत्त आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘समरसता श्री गणेश’ उत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सहभागाचे व्यासपीठ म्हणूनही मांडला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.