आयुर्वेदिक सौंदर्य उत्पादने प्रशिक्षण
एसआयआयएलसी
पुणे, ता. १८ : आयुर्वेदिक पद्धतीने विविध सौंदर्य उत्पादने तयार करण्याचे मार्गदर्शन करणारे विशेष प्रशिक्षण २२ मार्चला आयोजिले आहे. प्रशिक्षणात नैसर्गिक घटकांचा वापर करून सुरक्षित आणि त्वचेसाठी उपयुक्त सौंदर्य उत्पादने कशी तयार करावीत याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे. फेस क्रीम, शॅम्पू, फेसवॉश, साबण, लीप बाम, परफ्यूम, फेस पॅक, काजळ अशी विविध उत्पादने तयार करण्याच्या पद्धती शिकविणार आहेत. यासोबतच नैसर्गिक घटकांची निवड, उत्पादन तयार करताना घ्यावयाची काळजी, साठवणूक पद्धती तसेच बाजारपेठेतील मागणी याविषयीही माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणातून सहभागी महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
सीएसआर प्रशिक्षण
एनजीओ व सामाजिक काम करणाऱ्या संस्थांना आर्थिक गरज मोठ्या प्रमाणात असते. कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीमधून त्यांना ही गरज भागवता येते. मात्र हा निधी कसा मिळवावा, यासाठीचे नियम व कायदे काय आहेत, संस्थेचा प्रकल्प अहवाल कसा सादर करावा याची बहुतेकांना माहिती नसते. या पार्श्वभूमीवरील सीएसआर प्रशिक्षण २८ व २९ मार्चला आयोजिले आहे. यामध्ये सीएसआर नेमके काय आहे आणि काय नाही, सीएसआर कायदा, अंमलबजावणी संस्थांची भूमिका, रिपोर्टिंग फ्रेमवर्क, अंमलबजावणी करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतरची प्रक्रिया, सरकारच्या अपेक्षा, भूमिका आणि जबाबदाऱ्या, सीएसआर निधीसाठी कागदपत्रे व प्रक्रिया अशा बाबींवर मार्गदर्शन होणार आहे.
शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २९ मार्चला आयोजिले आहे. यात विविध विभागांतील नोंदणी, निविदा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, डिजिटली सही, ईएमडी व एसडीमध्ये सवलत कशी मिळवायची, मशिनरी नसल्यास भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल मार्गदर्शन होणार आहे. सरकारी कंत्राटदार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स, मटेरिअल पुरवठादार, वाहतूक करणारे, कौशल्य विकास क्षेत्रात काम करणारे, बचत गट, मॅनपॉवर सप्लाय एजन्सी आणि विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण
निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात ४ एप्रिलला आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ आणि त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, मशिनरी, फ्लो चार्ट, बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्पासाठी जागेची निवड, गुंतवणूक, प्रकल्प अहवाल इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

