मेंढपाळांची घाटमाथ्‍यावर कूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंढपाळांची घाटमाथ्‍यावर कूच
मेंढपाळांची घाटमाथ्‍यावर कूच

मेंढपाळांची घाटमाथ्‍यावर कूच

sakal_logo
By

लक्ष्मण डुबे, रसायनी
माणदेशातून चाऱ्याच्या शोधात कोकणात आलेले मेंढ्यांचे कळप पावसाळाजवळ आल्याने आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सहा-सात महिन्यांच्या मुक्कामानंतर पनवेल, पेण, उरणकडे गेलेले कळप आता रसायनी परिसरात, तसेच खालापूर तालुक्यात मुक्कामी आहेत. पाउस सुरू होण्यापूर्वी घाट चढून गावाच्या दिशेने ते मार्गस्थ होतील. रायगड, ठाणे जिल्ह्यात औद्यागिक विकास होऊ घातल्‍याने पूर्वीसारखा चारा मिळत नसल्‍याची खंत मेंढपाळांनी व्यक्त केली आहे.
दुष्काळसदृश परिस्थिती, चाऱ्या-पाण्याच्या टंचाईमुळे पुणे, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांतील मेंढपाळ कळपासह दरवर्षी कोकणात दाखल होतात. साधारण दसरा, दिवाळीनंतर हे कळप बोरघाट उतरून रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात येतात, त्‍यानंतर पुढे उरण, पेण, पनवेल तालुक्यात जात असल्‍याचे मेंढपाळ सांगतात. दरम्यान जिल्‍ह्यात औद्योगिक विकासाबरोबरच शेतजमिनी कमी झाल्‍या आहेत. शहरांबरोबरच गावागावांत गृहप्रकल्‍प उभे राहत असल्‍याने मोकळ्या जागाच शिल्‍लक नाहीत. त्‍यामुळे मेंढ्‌यांना चरण्यासाठी सोडता येत नाही. शेतीचे नुकसान होत असल्‍याचे सांगत अनेकांकडून चरण्यास विरोध केला जातो. तर वनविभागानेही रानात जनावरे चारण्यासाठी बंदी घातली आहे. त्‍यामुळे कळपाला मुबलक चारा मिळत नाही. त्यामुळे चाऱ्यांच्या शोधात भटकंती करावी लागत असल्‍याचे मेंढपाळ सांगतात.
‘पावसाळा जवळ येऊ लागला की मेअखेर खालापूर तालुक्यात बोरघाटापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतराच्या परिसरात त्‍यांचा मुक्‍काम असतो. जूनमध्ये पाऊस कधी सुरू होईल, याचा अंदाज घेऊन घाट चढून ते गावाकडे जातात. आता दळणवळणाची साधणे वाढली, मोबाईलसारखी संपर्क साधने आली, त्यामुळे पूर्वीप्रमाणे दूर राहत आहोत, हे जाणवत नाही, मात्र घाट चढून गेल्यावर गावात जाण्याची ओढ वाढत जाते, असे एक मेंढपाळाने सांगितले.

आतापर्यंत मेंढ्यांचे कळप सांभाळताना मुलांच्या शिक्षणाची आबाळ झाली. शिक्षण नसल्यामुळे त्‍यांना नोकरी-व्यवसाय करता येत नाही, त्‍यांचे नुकसान होत आहे. शिक्षणाचे महत्त्व लक्षात आले आहे. नातवंड शिक्षण घेत आहे. एकत्र कुटुंब आहे. घरची कामे आणि मुलांचे शिक्षण, त्यासाठी काही सदस्य गावालाच थांबतात.
- बबन हाके, पुरंदर

पनवेल, उरण आणि पेण तालुक्यात पूर्वीसारखा चारा मेंढ्यांच्या कळपांना मिळत नाही. त्यामुळे पुढे जात नाही. मोहोपाडा, आपटे, वडगाव, चौक पंचक्रोशीतील गावात कळप घेऊन फिरतो. रात्री शेतकऱ्यांकडून तळ बसवण्यासाठी मागणी झाली नाही, तर माळरानावर तळ ठोकून मुक्काम करतो.
- सागर भिवाजी पिंगळे, बारामती