‘हा सागरी किनारा’ बीच महोत्सव उत्साहात
‘हा सागरी किनारा’ बीच महोत्सव उत्साहात
रेवदंडा, ता. २९ (बातमीदार) : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने रेवदंडा समुद्रकिनारी आयोजित करण्यात आलेला दोनदिवसीय ‘हा सागरी किनारा’ बीच महोत्सव विविध कार्यक्रमांमुळे रंगतदार ठरला.
महोत्सवात उसळत्या समुद्र लाटांच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या ‘एक सांगीतिक कल्लोळ’ या कार्यक्रमाला सिनेअभिनेता सचिन श्रीधर यांच्या उपस्थितीत पर्यटकांनी भरभरून दाद दिली. समारोपाच्या दिवशी आयोजित बाल जत्रा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध गृहोपयोगी वस्तू, हस्तकला साहित्य तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरले.
विशेष म्हणजे हे सर्व स्टॉल सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महिला उद्योजिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. रेवदंडा गावात यापूर्वी कधीही अशा प्रकारचा बीच महोत्सव आयोजित न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

