टक्केवारीत काम करणारे नकोत; जनतेचे प्रश्न मांडणारे हवेत

टक्केवारीत काम करणारे नकोत; जनतेचे प्रश्न मांडणारे हवेत

Published on

टक्केवारीत काम करणारे नकोत; जनतेचे प्रश्न मांडणारे हवेत
जयंत पाटलांचा आमदार महेंद्र दळवींना अप्रत्यक्ष टोला
रेवदंडा, ता. १९ (बातमीदार) : टक्केवारीच्या राजकारणात गुंतलेले प्रतिनिधी आपल्याला नकोत. जिल्हा परिषदेत जनतेचे खरे प्रश्न मांडणारे, सामान्यांच्या हितासाठी लढणारे लोकप्रतिनिधी हवेत. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असा अप्रत्यक्ष टोला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांना लगावला.
अलिबाग तालुक्यातील चौल-तुळाडदेवी येथे म्हात्रे यांच्या प्रांगणात मंगळवारी (ता. १८) उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस यांची संयुक्त आघाडी बैठक पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडीतर्फे ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांना चौल जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, सध्याचे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांकडून दिशाभूल करणारे आरोप आणि दावे केले जात आहेत. अशा परिस्थितीत आघाडीतील सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. आघाडी म्हणून एकजुटीने लढलो, तर विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांकडून तीनशे कोटी रुपयांचा निधी आणल्याचे खोटे दावे केले जात आहेत. मात्र कोविडसारख्या महामारीच्या काळात आणि निसर्गाच्या चक्रीवादळात चौल परिसरातील बागायतदार उद्ध्वस्त झाला, तेव्हा हेच विरोधक कुठे होते?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जनतेच्या अडचणीच्या काळात साथ न देणाऱ्यांना आता विकासाच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही, असेही ते म्हणाले. या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भास्कर चव्हाण, तसेच आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com