संताचा सहवास महत्वाचा - ज्येष्ठ निरुपणकार श्रीपाद केळकर.
संताचा सहवास महत्त्वाचा ः ज्येष्ठ निरुपणकार श्रीपाद केळकर
रेवदंडा, ता. १२ (बातमीदार) : संतांच्या सहवासाने मनुष्याच्या जीवनात सुख, समाधान व आनंदाची खरी ओळख होते. नामस्मरण ही उपासनेची अत्यंत प्रभावी साधना असून नामामध्ये पापांचा नाश करण्याची तसेच भय व संकटांपासून मुक्ती देण्याची अद्भुत शक्ती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरुपणकार श्रीपाद केळकर (कल्याण) यांनी केले.
अलिबाग तालुक्यातील चौल येथील रामेश्वर पालखी मार्गावरील चंपावती आळीतील श्री समर्थ श्रीराम मंदिरात दासनवमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते निरुपण करताना बोलत होते. सगुण उपासनेतील श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पाद्यपूजा, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या साधनांपैकी नामस्मरणाचे महत्त्व त्यांनी विशेषत्वाने स्पष्ट केले. शुद्ध मनाने केलेले नामस्मरण व्यक्तीला दीर्घायुष्य व जीवनातील विविध टप्प्यांवर यश देण्यास सहाय्यक ठरते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीपाद केळकर यांनी समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि दासबोध यातील प्रेरणादायी विचार उलगडून सांगितले. अध्यात्म केवळ शिकवत नाही, तर कृतीशील जीवन जगण्याची प्रेरणा देते. सत्य, सातत्य, अभ्यास, आत्मविश्वास, नम्रता व कीर्ती मिळविण्यास योग्य आचरण यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
हा दासनवमी उत्सव ३७ व्या वर्षात पदार्पण करत असल्याची माहिती स्वागतपर भाषणात सुरेश साठे यांनी दिली. पहाटे काकड आरती, जप, आत्माराम ग्रंथ व मनाचे श्लोक यांचे सामूहिक वाचन झाले. सायंकाळी भक्तिसंगीताच्या मैफलीने उत्सवाची सांगता झाली. या वेळी गौरी बापट (पुणे) व आनंद जोशी (ठाणे) यांनी सहकाऱ्यांसह सादर केलेल्या भक्तिसंगीताने उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केले.
फोटो ओळ : दासनवमी उत्सवानिमित्त निरुपण करताना ज्येष्ठ निरुपणकार श्रीपाद केळकर तसेच कार्यक्रमाला उपस्थित भाविक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

