

रेवदंडा बाजारपेठेत रस्त्यावर अतिक्रमण
वाहतुकीला अडथळा, अपघातांची भीती
रेवदंडा, ता. २८ (बातमीदार) : रेवदंडा बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अलिबागकडून साळावमार्गे रोहा तसेच मुरुडकडे जाणारा हा एकमेव प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर मोठी वर्दळ असते. बाजारपेठेत घाऊक व किरकोळ व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असून गोळा स्टॉप ते थेरोंडा फाटा दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना व्यापारी संकुल आहेत. मात्र अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेरच मुख्य रस्त्यावर विक्रीसाठी साहित्य मांडल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, काही ठिकाणी दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकत नाहीत, तर पादचाऱ्यांनाही मोठी गैरसोय होत आहे.
ग्रामसभेत नागरिकांनी हा मुद्दा वारंवार मांडला असून यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी व्यापारी असोसिएशनला पत्र देऊन रस्त्यावर सामान ठेवण्यास मनाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वीही ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना समज देण्यात आली होती; मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून या समस्येवर ठोस कारवाईची गरज अधोरेखित होत आहे.