

अलिबाग तालुक्याला अवकाळीचा तडाखा
गारांच्या पावसाने जनजीवन विस्कळीत
रेवदंडा, ता. २१ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यासह चौल परिसराला मंगळवारी (ता. २१) पहाटे अवकाळी पावसाने झोडपून काढले. पहाटे पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला, त्यानंतर दिवसभर पावसाच्या हलक्या सरी सुरूच होत्या. या अचानक आलेल्या संकटामुळे आंबा बागायतदार धास्तावला असून हातातोंडाशी आलेला घास हिरवण्याची शक्यता आहे.
परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सकाळपासूनच वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने मोठी गैरसोय झाली. तर, नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. गारा आणि पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असून बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच, चौलमधील बागमळा भागात ताडाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, अलिबाग-रेवदंडा रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिर ते चौल नाकादरम्यान नाल्यांची कामे सुरु आहेत. पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी घसरण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. तर, अनेक ठिकाणी चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
बातमीला अलिबाग-रेवदंडा मुख्य रस्त्यावरील अवकाळी पावसाने झालेली दुरावस्थेचे फोटो पाठवले आहेत.
रेवदंडा-बातमीदार.