भातपिकांवर दवबिंदूंची नक्षी

भातपिकांवर दवबिंदूंची नक्षी
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १६ : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच कल्याण-डोंबिवली शहरासह ग्रामीण भागावर दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, १४ गावे, श्री मलंगगड परिसर तसेच लगतच्या गावांमध्ये पहाटेच्या वेळी धुक्यामुळे परिसराचे स्वरूपच बदलून गेले आहे. शहरातील रस्ते, मोकळी मैदाने आणि ग्रामीण भागातील भातशेती धुक्याने व्यापून गेली होती.

विशेष म्हणजे भातपिकांच्या पानांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू जमा झाल्याचे दिसून आले. धुक्यात हरवलेली हिरवीगार भातशेती आणि त्यावर चमकणारे दवबिंदू यामुळे ग्रामीण भागात निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळाले. शहरातून ग्रामीण भागाकडे सायकलिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी या दृश्याचे छायाचित्रण आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचे दिसून आले.

दरम्यान, पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने भातपिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातपिकांना चांगली वाढ मिळाली होती, मात्र सध्या पावसाचा खंड पडल्याने पिकांना आवश्यक असलेल्या पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. भातपीक अद्याप निसवण्याच्या अवस्थेत आलेले नसल्याने पुढील काळातील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दाट धुके आणि पिकांवरील दवबिंदू यामागील कारणांबाबत हवामानतज्ज्ञ अभिजित मोडक यांनी सांगितले की, सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान अशी स्थिती सामान्य असते. या काळात हंगामी पश्चिमेकडील वारे हळूहळू कमजोर होतात आणि रात्रीचे वातावरण अधिक शांत व निरभ्र बनते. मॉन्सूनमुळे जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने रात्री जमिनीचे विकिरणजन्य थंडकरण होते. त्यामुळे जमिनीलगतची हवा दवबिंदू तापमानापर्यंत थंड होते आणि परिणामी जमिनीवर धुक्याची निर्मिती होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com