

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ : गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच खोणी-तळोजा महामार्गालगत असलेल्या उसाटणे गावातील महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरमधील तांब्याच्या कॉइल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री चोरट्यांनी ट्रान्स्फॉर्मरमधील मौल्यवान साहित्य लंपास केल्याने गावासह परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातच नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
उसाटणे गावातील ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर पाहणी केली असता त्यातील तांब्याच्या कॉइल चोरीला गेल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रान्स्फॉर्मरमधील साहित्य चोरीला गेल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. महावितरणच्या वाडी मंडळ कार्यालयाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी ट्रान्स्फॉर्मरचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर त्यातील तांब्याच्या कॉइल काढून नेल्या. वीज यंत्रणेतील मौल्यवान साहित्याला लक्ष्य करून ही चोरी करण्यात आल्याने चोरट्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र चोरीमागील नेमके कारण आणि आरोपींची माहिती पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
पाेलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
याप्रकरणी उल्हासनगर येथील हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, चोरीचा तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, त्यातून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
गणेशोत्सवात गैरसोय
गणेशोत्सवाच्या काळातच ट्रान्स्फॉर्मरमधील साहित्य चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गावातील गणेश मंडळे, भाविक तसेच स्थानिक नागरिकांची वीजपुरवठ्याअभावी गैरसोय होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होत असल्याने महावितरणने दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
डाेंबिवली : उसाटणेतील ट्रान्स्फॉर्मरमधील तांब्याची कॉइल चोरीला गेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.