पेण पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
पेण पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
सभापतीपदासाठी महिला उमेदवारांमध्ये चुरस तीव्र होणार
वडखळ, ता. १४ (बातमीदार) : पेण तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी उत्सुकता वाढवणारे आरक्षण अखेर जाहीर झाले. पेण उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार नितीन परदेशी, निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत चिठ्ठीद्वारे पार पडली.
यावेळी एकूण १० पंचायत समिती गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या आरक्षणानुसार पेण पंचायत समितीचे सभापतीपद महिला सर्वसाधारण गटासाठी राखीव होते. यंदाही डोलवी, रावे आणि वडगाव या तीन गणांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने, आगामी निवडणुकीत सभापतीपदासाठी महिलांमध्ये चुरस वाढणार आहे. मागील कार्यकाळातही महिला सभापतीच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीने काम केले असल्याने, ‘तोच पिक्चर पुन्हा रिपीट होणार’ अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. या आरक्षणानंतर आगामी पंचायत समिती निवडणुकीत महिलांची प्रभावी उपस्थिती आणि नवा राजकीय चेहरा पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्तरावर उमेदवारांची तयारी, संघटनांची बैठक आणि पक्षीय गणिते यावर आता सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.