बोईसर रेल्वे यार्डाचा मार्ग मोकळा

बोईसर रेल्वे यार्डाचा मार्ग मोकळा
Published on

पालघर, ता. १७ : बोईसर रेल्वे स्थानकातील प्रस्तावित मालवाहू यार्डासाठी वन खात्याची ४.९८ हेक्टर (सुमारे १२.३२ एकर) जमीन महाराष्ट्र रेल्वे विकास महामंडळाकडे देण्याचा आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. १६) काढला. त्यामुळे बोईसर स्थानकातील नवीन मालवाहू यार्ड उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा प्रकल्प मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट-३ (एमयुटीपी ३) अंतर्गत राबविण्यात येणार आहे. यापूर्वी केंद्राच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने या वनजमिनीच्या वळतीकरणास अंतिम मंजुरी दिली होती.

बोईसर रेल्वे स्थानकाबाहेर सध्या मालवाहतुकीसाठी दोन यार्ड कार्यरत आहेत. रेल्वे स्थानकालगत असलेल्या यार्डात मालगाड्या उभ्या केल्या जातात. या यार्डातून विविध कंपन्यांपर्यंत दररोज ८० ते १०० ट्रेलरची ये-जा होते. खैरापाडा पुलाच्या पलीकडे असलेल्या दुसऱ्या मालवाहू यार्डातून बोईसर आणि तारापूर परिसरात उत्पादित होणाऱ्या अवजड वस्तू, विशेषतः स्टील बिलेट, देशाच्या विविध भागांत पाठविल्या जातात.

पश्चिम रेल्वेच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असून, बोईसर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील मालवाहू यार्डामुळे या प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे हे यार्ड बोईसर पश्चिमेकडील बीएआरसीच्या जुन्या गोदामाजवळ, चित्रालय परिसरालगत स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. प्रस्तावित यार्डासाठीची जमीन खासगी मालकीची तसेच संरक्षित वनक्षेत्र अशा दोन्ही प्रकारची आहे.

नवीन यार्डासाठी आवश्यक असलेली ४.९८ हेक्टर वनजमीन वन विभागाकडून एमआरव्हीसीकडे वळविण्याचा आदेश बुधवारी राज्य सरकारने जारी केला. त्यामुळे नवीन यार्डाच्या उभारणीसाठीची महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून, चौपदरीकरणाच्या कामातील अडथळा दूर होण्याची शक्यता आहे.

आठ तास वेळ खर्ची
बोईसर रेल्वे स्थानकाबाहेर सध्या मालवाहतुकीसाठी दोन यार्ड कार्यरत असून, रेल्वे स्थानकालगत असणाऱ्या यार्डात ३० ते ३५ डब्यांच्या मालगाड्या उभ्या केल्या जातात. प्रत्येक मालगाडीतून २२ टनाच्या १०० ते १२० लोखंडी कॉईलची वाहतूक केली जात असून, प्रत्येक मालगाडीमधून या कॉईल उतरवण्यासाठी आठ तास व त्यांची वाहतूक करण्यासाठी अतिरिक्त आठ तास जातात.

सुमारे १०० ट्रेलरची वाहतूक
रेल्वे मालवाहू फलाटावरून या कॉईलची वाहतूक ३२ फूट (२८ टन) व ४२ फूट (४२ टन) लांबींच्या ट्रेलर मधून केली जात असून, दिवसाला यार्डपासून विविध कंपन्यांपर्यंत ८० ते १०० ट्रेलर दररोज ये-जा करत असतात. शिवाय खैरापाडा पुलाच्या पलीकडे असणाऱ्या मालवाहू यार्डातून बोईसर, तारापूरमध्ये उत्पादित होणाऱ्या अवजड वस्तू (स्टील बीलेट) बाहेर पाठवण्यात येतात.

नवीन यार्ड कुठे?
तारापूर अणुऊर्जा केंद्र तसेच भाभा अणू संशोधन केंद्रातील अवजड उपकरणे आणण्यासाठी बोईसर रेल्वे स्थानकापासून बीएआरसी कॉलनीच्या जवळ असणाऱ्या जुन्या गोदामापर्यंत पूर्वी रेल्वेमार्गिका टाकण्यात आली होती. याच मार्गिकेला पुनर्जीवित करून बीएआरसीच्या कॉलनीलगत नवीन रेल्वे यार्ड उभारण्याचे प्रस्तावित आहे. या ठिकाणी ७१५ मीटर लांबीचे दोन व ९०९ मीटर लांबीचा एक यार्ड फलाट उभारण्यात येणार असून, या प्रत्येक यार्डातील फलाटाची रुंदी १५ मीटर प्रस्तावित आहे. बोईसर चित्रालय परिसराजवळील हा मालवाहू यार्ड कार्यरत झाल्यानंतर सध्या खैराफाटक परिसरातून होणारी मालवाहतूक गजबजलेल्या वस्तीतून होणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com