

विक्रमगडमध्ये विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय स्वयंपाकगृह
दीड एकर जागेवर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव
पालघर, ता. २२ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी दररोज २५ हजार विद्यार्थ्यांचे भोजन तयार करण्याची क्षमता असलेले केंद्रीय स्वयंपाकगृह उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड एकर जागा उपलब्ध होणार असून, आवश्यक शासकीय परवानग्या आणि मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे, मात्र प्रकल्पाची क्षमता २५ हजार विद्यार्थ्यांची असली, तरी सुरुवातीला दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांनाच भोजन पुरविण्याचे नियोजन असल्याने त्याच्या टप्प्याटप्प्याने विस्ताराकडे लक्ष लागले आहे.
विक्रमगड तालुक्यातील शाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या पोषणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आकडेवारीनुसार, तालुक्यातील २७३ शाळांमध्ये एकूण २९ हजार १२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळांतील १५ हजार ९१, आदिवासी कल्याण विभागाच्या शाळांतील दोन हजार ६३६ आणि अनुदानित आदिवासी शाळांतील तीन हजार ६०७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रस्तावित केंद्रीय स्वयंपाकगृहात मोठ्या प्रमाणावर भोजन तयार करून ते पात्र शाळांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. केंद्रीकृत पद्धतीने भोजन तयार केल्यामुळे अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि वितरणातील नियमितता राखण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पौष्टिक आहार उपलब्ध झाल्यास त्यांच्या आरोग्याबरोबरच शाळेतील उपस्थिती आणि अध्ययनातील सातत्यालाही चालना मिळू शकते, मात्र प्रस्तावित क्षमतेच्या तुलनेत पहिल्या टप्प्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. सुरुवातीला दोन ते तीन हजार विद्यार्थ्यांना भोजन पुरविल्यानंतर उपलब्ध सुविधा, शासकीय मान्यता आणि वितरण व्यवस्थेच्या तयारीनुसार प्रकल्पाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. जिल्हा परिषद, स्वयंअर्थसहाय्यित, खासगी अनुदानित तसेच शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या अनुदानित आदिवासी शाळांचा टप्प्याटप्प्याने समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.