

बोगस एफडीआरप्रकरणी
जव्हारमध्ये गुन्हा दाखल
आठ ते नऊ कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी; एफडीआर गायब झाल्याची वरिष्ठ लिपिकाची तक्रार
जव्हार, ता. २३ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार कार्यालयातील विकासकामांच्या निविदा प्रक्रियेत बनावट मुदत ठेव पावत्या (एफडीआर) सादर केल्याचे कथित प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी जव्हार पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २२) गुन्हा दाखल करण्यात आला. २०१९-२० या कालावधीतील सुमारे आठ ते नऊ कोटी रुपयांच्या एफडीआरशी संबंधित या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
जव्हार विभागाच्या फाइलमधील एफडीआर गायब झाल्याची तक्रार विभागातील एका वरिष्ठ लिपिकाने पोलिसांत केली होती. या तक्रारीनंतर आता बनावट एफडीआर कशा स्वीकारल्या गेल्या, त्यांची बँकेकडून पडताळणी झाली होती का आणि कागदपत्रे गायब होण्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास होणार आहे. ठेकेदारांबरोबरच कागदपत्रांची छाननी आणि पडताळणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिकाही तपासली जाणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासकीय कामांच्या निविदा प्रक्रियेत नियमानुसार अनामत किंवा सुरक्षा ठेव म्हणून एफडीआर सादर करावी लागते. निविदेतील अटींनुसार सुरक्षा रक्कम निश्चित केली जाते. काम पूर्ण झाल्यानंतर नियमांची पूर्तता झाल्यास ही रक्कम ठेकेदाराला परत केली जाते, मात्र सुरक्षा ठेव म्हणून बनावट एफडीआर सादर करण्यात आल्याचा आरोप असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने बनावट एफडीआर निविदेच्या कागदपत्रांसोबत जोडण्यात आल्याचा आरोप आहे. या कागदपत्रांच्या आधारे ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत पात्रता मिळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात संबंधित ठेकेदाराची भूमिका तपासण्याबरोबरच निविदा स्वीकारणारे, कागदपत्रांची छाननी करणारे आणि एफडीआरची पडताळणी करण्याची जबाबदारी असलेले अधिकारी-कर्मचारी यांचीही भूमिका तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.
-----------------
सुट्टीच्या दिवशी कार्यालयात एफडीआर
दसऱ्याच्या सुट्टीच्या दिवशी एका व्यक्तीने लिफाफ्यातून काही एफडीआरच्या पावत्या कार्यालयात आणून ठेवल्याची माहिती आहे. या पावत्यांवरील क्रमांक तपासले असता त्या अन्य ठेकेदारांच्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावत्यांचा चोरीला गेलेल्या एफडीआरशी संबंध नसल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने जव्हार पोलिसांना दिले आहे.
-------------
सार्वजनिक बांधकाम विभाग, जव्हार येथील एफडीआरप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
- किरण पवार, पोलिस निरीक्षक, जव्हार पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.