डॉ. बाबा आढाव महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग

डॉ. बाबा आढाव महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग
Published on

पुणे, ता. १ : ‘असंघटित कष्टकरी कामगारांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य समजून डॉ. बाबा आढाव यांनी स्वतःला त्या कार्यात वाहून घेतले. असंख्य कष्टकऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता आणण्यात ते यशस्वी झाले. त्यांनी एक गाव एक पाणवठा, देवदासी प्रथा, पालखीतील जातिभेदाविरुद्ध आंदोलनाद्वारे समतेचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा बाबा महत्त्वाचा भाग आहेत,’ असे मत ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचा (ता. १) रविवारी ९५वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त पवार यांनी आढाव यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच फुले पगडी देऊन त्यांचा सन्मान केला. या वेळी बाबांच्या पत्नी शीला आढाव, माजी महापौर अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नितीन पवार यांच्यासह हमाल, कामगार उपस्थित होते. या वेळी डॉ. बाबा आढाव विशेषांकाचे पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पवार म्हणाले, ‘बाबांनी उभे आयुष्य कष्टकऱ्यांची सेवा केली. त्यांचे आयुष्य हे विधायक कामांना प्रोत्साहन, सत्याचा पुरस्कार, लोकशाहीच्या चौकटीत राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रसंगी संघर्ष यासाठी राहिले आहे. त्यांनी कष्टकऱ्यांसाठी विधायक संस्था उभारून एक आदर्श निर्माण केला आहे.’

माथाडी कायदा टिकविण्यासाठी संघर्ष करणार : बाबा आढाव
डॉ. आढाव म्हणाले, ‘माथाडी कायद्याच्या रूपाने सरकारला एक रुपयाची गुंतवणूक न करता गरीब घटकाला दिलासा मिळेल, अशी व्यवस्था आम्ही उभी केली. राज्य सरकार तो कायदा मोडण्याचा प्रयत्न करीत आहे. माथाडी कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या खंडणीबहाद्दरांवर कारवाईऐवजी माथाडी कायद्यालाच नख लावायचा प्रयत्न सुरू आहे. वय कितीही झाले तरी कायदा टिकविण्यासाठी लोकशाही मार्गाने टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे. यामध्ये शरद पवार यांच्यासारख्या नेतेमंडळींनी साथ द्यावी.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com