esakal | तुर्भेतील शौचालयाचे मलमिश्रित पाणी रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

मलमिश्रित पाणी रस्त्यावर पसरले आहे

राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईतील सार्वजनिक शौचालयांचे वास्तव अतिशय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. 

तुर्भेतील शौचालयाचे मलमिश्रित पाणी रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई :  राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबईतील सार्वजनिक शौचालयांचे वास्तव मात्र, अतिशय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. एकीकडे शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिका उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत आहे, तर दुसरीकडे ज्या शौचालयांत जाण्याचे आवाहन पालिका करत आहे, ती शौचालयेच अत्यंत गलिच्छ स्थितीत असल्याचे समोर आले आहे. 

शहरातील अनेक शौचालये बाहेरून चकाचक दिसतात. मात्र, पाणी नसणे, ठरलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क वसूल करणे, शौचालयाच्या वरच्या मजल्यावर १०/१२ जणांनी बस्तान बसवणे; असे प्रकार सर्रास घडत आहेत. त्यातच तुर्भे एमआयडीसी परिसरतील इंदिरानगर येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानदरम्यान तीन शौचालये उभारण्यात आले आहेत. मात्र, स्वच्छ भारत अभियानाची सांगता होताच शौचालयाचा पुरता बोजवारा उडाला आहे. 

या परिसरात पालिकेकडून तीन शौचालय बांधण्यात आले आहेत. मात्र, सध्या शौचालयाची सेप्टी टॅंक ओव्हर फ्लो होऊन शौचालयातील मलमिश्रित पाणी रस्त्यावर जमा होऊन परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या मलमिश्रित पाण्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्‍यता आहे. स्वच्छ भारत अभियानादरम्यान शौचालयाच्या बाहेरील भिंतींवर मनपाने घोषवाक्‍य लिहित स्वच्छतेबाबत जनजागृती केली; तर दुसरीकडे दुर्लक्षितपणाचा नजारा आ वासून उभा राहिला आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी मनपाकडे तक्रारीदेखील केल्या आहेत. 

त्वरित त्या ठिकाणी स्वच्छता अधिकारी यांना पाठवून पाहणी करून लगेच दुरुस्ती करून स्वच्छ करण्यास सांगितले जाईल.
- समीर जाधव, तुर्भे विभाग अधिकारी

याबाबत स्वच्छता अधिकारी यांना वारंवार पत्रव्यहार करण्यात आला. तसेच माजी पालिका आयुक्त एन. रामास्वामी यांच्याकडेदेखील याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र, याबाबत तुर्भे विभागाकडून सहा महिन्यांनंतर सदरील काम करण्याचे उत्तर देण्यात आले, जे अद्याप प्रलंबित आहे.  
- महेश कोटीवले, तुर्भे विभागप्रमुख (शिवसेना)

loading image
go to top