पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदाची निवडणूक, भाजपच्या हालचालींवर शिवसेनेचं लक्ष

समीर सुर्वे
Sunday, 4 October 2020

बई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी सोमवारी म्हणजेच उद्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

मुंबईः  मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी सोमवारी म्हणजेच उद्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसनेही उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे भाजपच्या हालचालींवर शिवसेनेचे लक्ष लागून आहे.

शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या संध्या दोषी, भाजपच्या सुरेखा पाटील आणि कॉंग्रेसच्या संगिता हांडोरे यांच्या लढत होत आहे. तर, स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे यशवंत जाधव, भाजपचे ऍड.मकरंद नार्वेकर आणि कॉंग्रेसचे आसिफ झकेरीया यांच्यात लढत होत आहे. ही निवडणुक तिरंगी झाली तर बहुमताच्या जोरावर शिवसेनेचा विजय निश्‍चित आहे. पण, भाजप शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत देऊ शकते,अशी भीती शिवसेनेला सतावत असल्याने त्यांची धाकधुक वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. निवडणूक लढणार असल्याचे विरोधी पक्षनेते रवी राजा ठाम आहेत. तर, भाजपही निवडणुकीवर ठाम आहे. फक्त आयत्या वेळी कॉंग्रेसने उमेदवार मागे घेऊ नये असे आव्हान भाजप कडून नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी दिले आहे.

अधिक वाचाः  NCB भाजपच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी कधी करणार, काँग्रेसचा सवाल

कॉंग्रेसची लढाई लुटूपुटीची

राज्यात महाविकास आघाडी असताना पालिकेत कॉंग्रेसचा विरोधी पक्षनेता आहे. आम्ही पालिकेत विरोधात असल्याचे सांगून कॉंग्रेस निवडणूक लढत आहे. मात्र, ही केवळ लुटूपुटीची लढाई असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीचे अर्ज भरुन काँग्रेसकडून म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाचे अध्यक्षपदासह काही प्रभाग समित्यांवर दावा सांगितला आहे. त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठांशीही चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

अधिक वाचाः  नेस्को कोविड सेंटरमधील अस्थायी कर्मचारी गेले 3 महिने वेतन विना

 
न्यायालयातही फायदा

पालिकेतील विरोधी पक्ष पदासाठी भाजप सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. सध्या हे पद पालिकेतील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे राज्यात सत्ता असली तरी पालिकेत आम्ही विरोध पक्षाची भूमिका चोख निभावत असल्याचे दाखविण्यासाठी कॉंग्रेस ही निवडणुक लढणार असल्याची चर्चाही पालिका वर्तुळात सुरु आहे.

संख्याबळ

शिक्षण समिती

-शिवसेना - 13 (2 स्विकृत सदस्यांसह)
-भाजप -10 (1 स्विकृत सदस्यांसह)
- कॉंग्रेस - 4
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 1
- समाजवादी पक्ष - 1

स्थायी समिती

-शिवसेना -11
-भाजप -10(1 सदस्य स्विकृत नगरसेवक असल्याने 1 मत कमी )
-कॉंग्रेस - 3
-राष्ट्रवादी कॉंग्रेस - 1
- समाजवादी पक्ष - 1
-शिक्षण समिती अध्यक्ष पदसिध्द सदस्य

-----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Tomorrow election for post Municipal Standing and Education Committee Chairman


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tomorrow election for post Municipal Standing and Education Committee Chairman