संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शुकशुकाट, प्रदूषण मुक्त वातावरणात प्राण्यांचा मुक्त वावर

दिलीप यादव
Wednesday, 16 September 2020

कोरोनाच्या सांसर्गिक प्रादुर्भाव लक्षात घेता बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अजूनही पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आले आहे. अंतर्गत भागातील कान्हेरी गुफा ही पर्यटकांसाठी बंदच ठेवल्या आहेत.

मुंबई: कोरोनाच्या सांसर्गिक प्रादुर्भाव लक्षात घेता बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अजूनही पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आले आहे. अंतर्गत भागातील कान्हेरी गुफा ही पर्यटकांसाठी बंदच ठेवल्या आहेत. उद्यानाच्या सभोवतीचे आदिवासी पाड्यावर बांधव काळजी घेताना दिसून येत आहे. पर्यटक आणि वाहनांची वर्दळ नसल्यामुळे येथील प्राणी मुक्तपणे संचार करताहेत. 

लॉकडाऊनपासून बोरीवलीचे संजय गांधी उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार पर्टकांसाठी बंदच आहे. सुरक्षा रक्षकांची नजर असून प्रत्येक अभ्यागताची चौकशी करून प्रवेश दिला किंवा नाकारला जातो. टायगर-लायन सफारी बंद आहे.  उद्यानाच्या आतील भागात असणारी आणि पर्यटकांचे विशेष आवडते स्थळ असणाऱ्या कान्हेरी गुफेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे.

मार्च महिन्यात कोरोना संसर्गामुळे वन खात्याने उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांपूर्वी काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर स्थानिक पालिका कार्यालय प्रभाग आणि आरोग्य यंत्रणांनी विभाग सील करून मोठी खबरदारी घेत विभाग सुरक्षित केल्याची माहिती उप वनसंरक्षण सचिन रेपाळे यांनी दिली.

प्राण्याचा मुक्त वावर

पर्यटकांचा वावर, गोंधळ नसल्याने प्राण्यांना मुक्त स्वातंत्र्य मिळाले असून कधी नव्हे एवढे स्वैरपणाने प्राण्यांचा मुक्त वावर आढळून येत असल्याचे उद्यानातील कर्मचारी आणि आदिवासी पाड्यावरील बांधव सांगतात. मागील काही महिन्यांपासून अपवाद वगळता वाघ आणि सिंह पिंजऱ्यात राहात असून त्यांच्या मुक्त संचारावर काहीसे निर्बंध आहेत. जवळपास ५० एकरावरील जागेत प्राणी अन्य वेळी मुक्त वावर करतात. सध्या त्यांच्या अन्न आणि आरोग्याकडे जातीने लक्ष ठेवण्यात येत आहे. लॉकडाऊन काळातही प्राण्यांच्या आहारावर कोणताही परिणाम नसून नेहमीप्रमाणे व्यवस्थित आहार पुरविला जात असल्याचं वनाधिकारी सचिन रेपाळे यांनी म्हटलंय.
 

आदिवासी पाड्यावर खबरदारी

उद्यानाच्या आत असलेल्या आदिवासी पाड्यांवर काही विशेष असे निर्बंध नाही. मात्र केवळ आवश्यक बाबींसाठीच परिसरात किंवा बाहेर जाण्याची परवानगी प्रशासनाकडून दिली जात आहेत. कोरोना संसर्गाच्या भीतीने आदिवासी पाड्यांवरील बांधवही विनाकारण बाहेर जाणं टाळत असल्याचं पाडा निवासी देवराज पागे यांनी सांगितले.

 

मॉर्निंग वॉक बंद

गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहती मध्ये विविध ठिकाणाहून आत प्रवेश करण्यास मार्ग असल्याने सकाळ- संध्याकाळी वॉकसाठी नागरिक येतात . मात्र बोरिवलीच्या उद्यानात मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने बाहेरील नागरिकांना फिरण्यास मज्जाव आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षितता घेतली जात असल्याचे वन विभागाने सांगितले आहे. 

प्रदूषण आणि कचरा मुक्त
 
उद्यानाच्या परिसरात काही बिबळे मात्र मुक्तपणे संचार करीत आहेत. काही प्राणी या कालावधीत पिंजऱ्यात असले तरी मानवी वस्ती वरील बिबळ्याचे दर्शन मात्र अधून मधून होतच असल्याचे आदिवासी पाड्यांवरील बांधव सांगतात. या संपूर्ण विभागात पर्यटकांचा वावर नसल्यानं शांतता दिसून येत आहे. त्यामुळे नेहमीचा गोंधळ आणि कोलाहलाचे वातावरण आता शांततामय झाले आहे. बरोबर वाहनांची ये-जा नसल्यानं वाहतूक नाही. या सर्वांचा चांगला परिणाम येथे दिसत असून ध्वनी आणि पर्यावरण प्रदूषण मुक्त असे वातावरण सध्या तरी येथे दिसते. पर्यटक नसल्यामुळे हा परिसर कचरा मुक्त झाल्याचे दिसते आहे.

वनविभागाचा महसूल बुडाला

उद्यान विभागात प्रवेश तसेच सफारी साठीचे शुल्क मिळणे मागील पाच महिन्यांपासून बंद असल्याने सरकारचा महसूल बुडत आहे. जंगल विभागात भाड्याने देण्यात येणारे तंबूचे आगाऊ आरक्षण घेणे आणि भाड्याने देणे ही बंद असल्यानं प्रशासनाला त्याही महसूलावर पाणी सोडावे लागत आहे.

------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Tourism closed Sanjay Gandhi National Park Free movement animals


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism closed Sanjay Gandhi National Park Free movement animals