गावकीच्या बोली दहीहंड्यांची परंपरा कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला आलेल्या नवी मुंबईत आजही गावकीच्या बोली दहीहंड्यांची परंपरा जोपासली जात आहे. या दहीहंड्यांसाठी एक हजारापासून ते एक लाखापर्यंत बोली लावली जाते.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी म्हणून नावारूपाला आलेल्या नवी मुंबईत आजही गावकीच्या बोली दहीहंड्यांची परंपरा जोपासली जात आहे. या दहीहंड्यांसाठी एक हजारापासून ते एक लाखापर्यंत बोली लावली जाते. याशिवाय गावकीची मानाची बोली असलेली हंडी फोडल्यानंतरच इतर हंड्या फोडल्या जातात. ही परंपरा अनेक वर्षांपासून शहरात जोपासली जात आहे. काळ बदलतो, तसे शहर बदलते; मात्र गावकीचा मान असलेल्या बोली हंड्यांची परंपरा अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.

आगरी आणि कोळी समाजाचे विशेष आकर्षण असलेली गावकीची बोली दहीहंडी ही गावातल्या मारुतीच्या किंवा गणपती, विठोबा-रखुमाईच्या मंदिरात बांधली जाते. या बोली दहीहंडीत अख्खे गावच सहभागी होते. गावातून आधी ढोल-ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पालखी ज्या वेळी गावातील मंदिरात पोहचते, त्यानंतर बोली सुरू केली जाते. बोली हंडीची परंपरा ही तुर्भे गाव, कोपरखैरणे, सानपाडा, कोपरी गाव, घणसोली, गोठीवली, ऐरोली गाव, दिवा गाव, नेरूळ अशा २९ गावांमधून अनेक गावांनी आजही आपली बोली दहीहंडीची परंपरा जोपासली आहे. शिरवणे गावात तर पिढ्यान्‌ पिढ्या डोक्‍याने हंडी फोडण्याची परंपरा सुरू आहे. पावणे गावात डोळ्यांवर पट्टी बांधून दहीहंडी फोडली जाते. सानपाडा गावात रात्रीच्या हंड्या फोडल्या जातात. 

कोपरखैरणे गावातील बोली दहीहंडीचे हे यंदाचे ५४ वे वर्ष आहे. दहीहंडी आली की गावात एक प्रकारे आनंदाला उधाणच येते. गेल्या वर्षी एक लाख ७७७ रुपयांची बोली दहीहंडी फोडण्यात आली होती. त्यामुळे नवी मुंबईतील तरुणांना या बोली दहीहंडीचे वेध लागले आहेत. 

रकमेचा वापर विकासकामांसाठी
बच्चे कंपनीसाठी चोर हंडी बांधली जाते. त्यामुळे बोली हंडीसोबतच चोर हंडीची परंपरा आजही कायम आहे. बोली हंडीची जी काही रक्कम असते, ती गावातील आध्यात्मिक कार्यासाठी वापरली जाते. 

गावकीचे सणवार बंद होण्याच्या मार्गावर
मध्यंतरी बोली हंड्या बंद होण्याच्या मार्गावर होत्या; पण पुन्हा ‘जुने ते सोने’ म्हणतात, त्याप्रमाणे शहरात बोली हंड्यांची परंपरा जोपासली जात आहे. शहरीकरणाच्या दृष्टिकोनातून शहरातील गावांचा विकास झाल्याने गावकीचे सणवार हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहेत; मात्र बोली हंडीची परंपरा आजही कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tradition of the dialect of the villagers remains