मोखाडा - पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात होळीकोत्सवानंतर दुसर्या दिवसापासून आठ दिवस जगदंबा ऊत्सव (बोहाडा) साजरा करण्याची शेकडो वर्षाची अखंडित परंपरा आहे.
धूलिवंदनापासुन सुरुवात झालेल्या या ऊत्सवात सर्व जाती धर्मातील नागरीक सहभागी होतात. देव देवतांचे मुखवटे घालुन, संबळ च्या तालावर, टेंभ्याच्या प्रकाशात विशिष्ट तालावर सोंगे नाचवली जातात. आदिवासी नागरी संस्कृतीचे प्रतिक म्हणून मोखाड्याचा बोहाडा सबंध महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
आदिवासींच्या परंपरागत देवता, रामायण, महाभारत, रामविजय, विष्णुपुराण, पांडव प्रताप ईत्यादी धार्मिक ग्रंथातील देवता, या ऊत्सवासाठी निवडल्या गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या ऊत्सवासाठी आदिवासी कलाकारांनी अप्रतिम हस्तकौशल्यातुन ऊंबर, सागाच्या लाकडात कोरुन, रेखीव देवदेवतांचे मुखवटे तयार केले आहेत.
त्यावर आधुनिक रंग आणि कलाकुसर करुन अधिक आकर्षक बनवले आहेत. त्यानंतर रुढी, परंपरेने विशिष्ट घराण्यांमध्ये त्याचे वाटप करण्यात आले आहे. देवदेवतांचे मुखवटे घालुन, पौराणिक आयुधे तसेच पोशाख घालुन वाजंत्री आणि संबळच्या तालावर लयबद्ध नृत्याचा ऊत्सव म्हणून 'बोहाडा' साजरा केला जातो. या ऊत्सवाला सुमारे 250 अधिक वर्षाची परंपरा लाभली आहे. तर अनेक मुखवटे 200 वर्षांपासून आजही सोंगाच्या ताफ्यात आहेत.
1) गणरायाचे विधीवत पुजा करुन ऊत्सवाला सुरुवात...
फाल्गुन वद्य प्रतिपदा ते वद्य अष्टमी असे आठ दिवस ऊत्सवाचे आहेत. धूलिवंदनालाच गणरायाच्या मिरवणुकीने ऊत्सवाला प्रारंभ झाला आहे. जगदंबा मंदिरासमोरील मंडपामध्ये गणरायाचे विधीवत पुजन करण्यात आले आहे.
द्वितीयेस मत्स्यावतार, तृतियेस कुर्मावतार, चतुर्थीला वराह अवतार, पंचमीस भीम- हिडींबा राक्षणीचा विवाह व भीम बकासुर युध्दाचा महाभारतातील प्रसंग, षष्ठीस लहान बोहाडा व सप्तमीला रात्री 8 ते अष्टमीच्या सकाळी 8 वाजेपर्यंत असा रात्रभर मुख्य बोहाडा ऊत्सव साजरा केला जातो.
2) रावणाच्या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण.....
पहाटे दशानन रावणाची मिरवणुक काढण्यात येते. या सोंगाचे बोहाड्यात विशेष आकर्षण असते. रावणाची मिरवणुक बघण्यासाठी सर्वचजण आतुर असतात. त्यासाठी मोठी गर्दी केली जाते. या मिरवणुकीसाठी संबळचे ताफे ही सज्ज असतात. डोळ्याचे पारणे फिटणारे नृत्य केले जाते.
3) अष्टमीला जगदंबेची विजयी मिरवणुक.....
अष्टमीला सकाळी जगदंबेची भव्य महापुजा केली जाते. देवी - महिषासुर, शुंभ- निशुंभ यांच्या युध्दाचा थरारक प्रसंग साकारला जातो. त्यानंतर जगदंबेची विजयी मिरवणूक काढली जाते. यावेळी रस्त्यावर प्रत्येक घरासमोर सडा, रांगोळी काढली जाते. देवीच्या मिरवणुकीत फुले, अक्षता, कुरमुरे व लाह्या ऊधळल्या जातात. त्यानंतर कुस्त्यांचा जंगी फड भरतो. यामध्ये कुस्त्यांची दंगल पहावयास मिळते.
3) ऊत्सवाला सर्व स्तरातील नागरिकांची हजेरी.....
तालुक्यासह विविध भागातील आदिवासी वर्षभराचे कष्टाचे जीवन विसरुन या ऊत्सवात सहभागी होतात. महिला नटून- थटून मोखाड्यात लोंढ्याने येतात. महिला फुले, पाने, गजरे व पारंपरिक वेशभुषेत सजुन येतात.
या ऊत्सवाची महती आणि माहिती असणारे नागरीक, आदिवासी कला, संस्कृतीचे अभ्यासक, कलात्मक रसिक व जगदंबा भक्त महाराष्ट्र आणि गुजरातच्या कानाकोपऱ्यातुन येतात. हिंदु व मुस्लिम बांधव, त्यांचे नातेवाईक, सासुरवाशिणी बदली होऊन गेलेले चाकरमानी आपल्या मुला - बाळांसह या ऊत्सवाला हजेरी लावतातच.
4) ट्रस्ट आणि प्रशासन सज्ज आणि सतर्क.....
यात्रोत्सवात विद्युत रोषणाई, मंडप, दिवट्यांसाठी तेल, पिण्याचे पाणी, लाईटची व्यवस्था, सोंगाचे मेकअप, वाजंत्री ताफे, जगदंबेची महापुजा याची सर्व व्यवस्था जगदंबा ट्रस्ट आणि नियोजन समिती करते. लिलावाच्या रकमेतून हा सर्व खर्च भागविला जातो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच ईतर सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपंचायत प्रशासन आठ दिवस सज्ज आणि सतर्क असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.