ठाण्यातील सिडको परिसराची "कोंडी' 

दीपक शेलार
रविवार, 15 डिसेंबर 2019

वाहतूक कोंडी आणि ठाण्याचे जणू समीकरणच बनले आहे. सकाळ-संध्याकाळ कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत असताना ठाणे पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या सिडको परिसरातून वाट काढताना वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील रस्त्यावर वेड्यावाकड्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे आणि मुजोर रिक्षाचालकांमुळे अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापलेला असतो. त्यामुळे वाहनांसह पादचाऱ्यांचीही कोंडी होत असते. येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस असतानाही वाहनचालक जुमानत नसल्याने कोंडीत भर पडत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. 

ठाणे : वाहतूक कोंडी आणि ठाण्याचे जणू समीकरणच बनले आहे. सकाळ-संध्याकाळ कोंडीचा सामना ठाणेकरांना करावा लागत असताना ठाणे पूर्व-पश्‍चिम जोडणाऱ्या सिडको परिसरातून वाट काढताना वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या भागातील रस्त्यावर वेड्यावाकड्या उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे आणि मुजोर रिक्षाचालकांमुळे अर्ध्याहून अधिक रस्ता व्यापलेला असतो. त्यामुळे वाहनांसह पादचाऱ्यांचीही कोंडी होत असते. येथील वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिस असतानाही वाहनचालक जुमानत नसल्याने कोंडीत भर पडत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. 

ठाणे पश्‍चिमेकडील भागात सिडको थांबा साधारणपणे ऐशीच्या दशकात उदयाला आला. ठाणे रेल्वेस्थानकानजीक चेंदणी कोळीवाडा परिसरातील खाडीकिनारी भागात सिडको प्राधिकरणाने रेल्वे सबवे शेजारी हे बस स्थानक उभारले. याच ठिकाणी एक मोठे महाविद्यालय आहे. पूर्वी या स्थानकावर खासगी बसची ये-जा होत असे. कालांतराने नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेची (एनएमएमटी) बस सेवा सुरू झाली.

त्यातच ठाणे महापालिकेच्या टीएमटी सेवेच्याही बस धावत असतात. याशिवाय रिक्षा-टॅक्‍सीसह ठाणे रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणारी अनेक खासगी वाहने तसेच, सबवेमार्गे कोपरीला जाणारी वाहनेही सिडकोमार्गे मार्गक्रमण करतात. त्यामुळे सिडको परिसर नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. 

अनेकदा रिक्षाचालक थांबा सोडून उभे राहत असल्याने सकाळ-संध्याकाळ याठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात असतात. तरीही रस्ते कमी पडत असल्याने पोलिस कर्मचारीदेखील हतबल होतात. त्यामुळे महापालिकेने सिडको परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी जोर धरीत आहे. 

सिडको परिसरात वाहतूक शाखेची खुली चौकी असून वाहनचालकांवर नियमित कारवाई केली जाते. हा रस्ता अरुंद असून नवी मुंबईसह भिवंडी आणि कळवा परिसरातील वाहने आणि प्रवाशांचा ताण वाढत आहे; तरीही नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल. 
- कवयित्री गावित 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic Jam at CIDCO area in Thane