esakal | धोरण कागदावर; फेरीवाले रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरार शहरात रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून ते गिळंकृत केल्याने झालेली वाहतूक कोंडी.

वसई-विरार शहरात रस्ते रुंदीकरण झाले असले तरीही फेरीवाले, गॅरेजचालकांनी अतिक्रमण करून रस्ते गिळंकृत केले आहेत. महापालिकेतर्फे फेरीवाला धोरणावर कार्यवाही करण्याचे सांगितले जात असले, तरी ते कागदावरच आहे.

धोरण कागदावर; फेरीवाले रस्त्यावर

sakal_logo
By
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा

वसई : वसई-विरार शहरात रस्ते रुंदीकरण झाले असले तरीही फेरीवाले, गॅरेजचालकांनी अतिक्रमण करून रस्ते गिळंकृत केले आहेत. महापालिकेतर्फे फेरीवाला धोरणावर कार्यवाही करण्याचे सांगितले जात असले, तरी ते कागदावरच आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांना गैरसोईंचा सामना करावा लागत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात असली, तरी फेरीवाले पुन्हा बस्तान मांडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

वसई-विरार महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. रस्त्यांचे रुंदीकरण केले जाते; मात्र त्याचा वापर नागरिकांसाठी होण्याऐवजी त्यावर फेरीवाल्यांकडून अतिक्रमण केले जाते. भाजी विक्रेते, कपडे, मोबाईल, भांडी विक्रेते हातगाडे मांडून व्यवसाय करतात. काही फेरीवाले रस्त्यावरच ठाण मांडून बसतात. जाताना कचरा रस्त्याकडेलाच टाकून देतात. त्यामुळे दुर्गंधी, कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होत आहे. रेल्वेस्थानकाच्या १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास बंदी आहे; परंतु नियम पायदळी तुडवून फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरूच आहे. नालासोपारा, वसई, विरारमधील मुख्य रस्ते, गर्दीची ठिकाणे आदी भागात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या पथपथावरदेखील अतिक्रमण केले जाते. 

फेरावाल्यांकडून कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनादेखील उद्धट बोलले जाते. महापालिकेने कारवाईसाठी बिट मार्शल नेमले असले, तरी केवळ दंडनीय कारवाई होत असल्याने कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा रस्त्यांचा आसरा घेत आहेत. कायमस्वरूपी कोणतीच योजना नसल्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण पुन्हा जैसे थे दिसत आहे. रेल्वेस्थानकाजवळही फेरीवाल्यांचे साम्राज्य असून संध्याकाळी गर्दीच्या ठिकाणी कोंडी होत आहे. याचा फटका प्रवाशांसह नागरिकांना बसत आहे. याबाबत पालिकेकडे तक्रार केली, तर कारवाई होते. त्यानंतर कुणी फिरकतही नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने फेरीवाला समिती स्थापन केली आहे. सर्वेक्षण केले आहे. बायोमॅट्रिक पद्धतीने फेरीवाल्यांचे नाव, पत्ता, हाताचा अंगठा, डोळ्यांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. हे सर्व पूर्ण झाल्यावर त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहेत. 

ओळखपत्र दिलेले फेरीवाले तिथेच बसले आहेत का हे बायोमॅट्रिक पद्धतीने तपासले जाणार आणि तसे न आढळल्यास कारवाई केली जाणार आहे; मात्र यासाठी फेरीवाला क्षेत्र, ना फेरीवाला क्षेत्र निश्‍चित केले गेले नाही. त्यामुळे फेरीवाला धोरण तयार असले तरी, अमंलबजावणी झाली नसल्याने रस्ते, पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांचे फावत आहे. एकीकडे कोंडीची समस्या जटील बनली असताना त्यात फेरीवाल्यांची भर 
पडत आहे. 

लवकरच फेरीवाला धोरण निश्‍चित केले जाणार आहे. फेरीवाल्यांसाठी जागा ठरवून दिली जाईल. यासाठी नऊ प्रभागांतून प्रभागातील सहायक आयुक्तांना जागेच्या पाहणीसाठी सूचना दिल्या आहेत. रस्ते व्यापणाऱ्या, पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे.
- बी. जी. पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका

सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. महापालिकेने फेरीवाल्यांबाबत योग्य ती दखल घ्यावी. रस्त्यावरील गॅरेज, फेरीवाले याबाबत योग्य ती कार्यवाही केली, तर रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. 
- विलास सुपे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

loading image
go to top