उल्हासनगर - जिकडेतिकडे रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्ग सांगण्याकरिता आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उल्हासनगर वाहतूक शाखेच्या पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आला आहे.
शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनत असून त्यासाठी जुने रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. ड्रेनेजच्या लाईनीसाठीही रस्त्यांचे खोदकाम केलेले आहे. विशेष म्हणजे एकेक रस्ता घेण्याऐवजी सरसकट रस्ते खोदण्यात आल्याने कोणत्या रस्त्याने जावे अशी द्विधा मनस्थिती वाहन चालकांची झालेली असून, त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण होताना दिसून येत आहे. पुढेही जाता येत नाही आणि मागेही वळता येत नाही, असे मध्येच अडकून पडण्याची वेळ वाहन चालकांवर अनेकदा येत आहे.
जिथे कुठे वाहतूक कोंडीची माहिती मिळते तिथे तात्काळ वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे हे टीम सोबत धाव घेऊन वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करत असल्याचे चित्रही आता नित्याचे झाले आहे.
'खोदलेल्या रस्त्यांच्या कामाची कासवगती'
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या हॉटेल एम्ब्रॉसिया,हॉटेल प्रवीण इंटरनॅशनल येथून रस्त्याचे खोदकाम करून बराच कालावधी झालेला आहे. हीच परिस्थिती हिराघाट ते डर्बी चौक आणि काजल पेट्रोल जवळील भंगार गल्लीच्या रस्त्याची आहे. कॅम्प नंबर 4 व 5 मधील देखील असंख्य रस्त्यांचे खोदकाम करण्यात आलेले आहे.
रस्ते खोदून ठेवलेत पण काम मात्र कासवगतीचे होत असल्याने वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हिराघाट ते डर्बी हा वन वे मार्ग आहे. मात्र हा रस्ता खोदण्यात आल्याने येथील वाहतूक 17 सेक्शन चौकातून वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे या रोडवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांच्या टीमने बॅरिगेट लावून हा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला आहे.
'वाहतूक पोलिसांचे महानगरपालिकेला पत्र'
खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. कोंडी सोडवण्यासाठी व पर्यायी मार्ग सांगण्याकरिता पोलिसांना उन्हातान्हात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे कासवगतीने सुरू असलेल्या कामांना गती देण्यात यावी, अशी मागणी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरे यांनी महानगरपालिकेला दिलेल्या पत्रात केली आहे.
'कामांना गती,हमखास रिझल्ट मिळणार'
यासंदर्भात महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता, जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारला आहे. जिथे सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची मोजक्या टक्क्यात सुरू होती त्यास अनेक पटीने गती देण्यात आली असून सातत्याने आढावा घेण्यात येत आहे.
दर गुरुवारी विकासकामांविषयी बैठकी घेतल्या जात आहेत.लवकरच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी, डॉ. बालाजी किणीकर, सुलभा गायकवाड यांच्या सोबत बैठक घेतली जाणार आहे. कामांची गती पाहता उल्हासनगरकरांना चांगला रिझल्ट मिळणार असा विश्वास आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.