महिलांना रिक्षा चालवण्याबरोबर योगाचे प्रशिक्षण, मुंबई महापालिका महासभेत ठराव

समीर सुर्वे
Sunday, 20 September 2020

मुंबईतील गरजू महिलांना रिक्षा चालवण्याबरोबरच योगाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसा ठराव मुंबई महापालिकेच्या महासभेत करण्यात येणार आहे.

मुंबई, ता. 20 : मुंबईतील गरजू महिलांना रिक्षा चालवण्याबरोबरच योगाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसा ठराव मुंबई महापालिकेच्या महासभेत करण्यात येणार आहे. ठराव मंजूर केल्यानंतर प्रशासन त्यावर अंतिम निर्णय घेईल. जेंडर बजेट अंतर्गत मुंबई महापालिकेला गरजू महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी विविध गृह उद्योगांचे प्रशिक्षण देते. तसेच या महिलांना शिलाई मशीन, मसाला मशीन, पीठ तयार करण्याचे यंत्र मोफत उपलब्ध करून देते.

भाजपच्या सदस्या जागृती पटेल यांनी गरजू महिलांना रिक्षा चालवण्याचे,तसेच योगा आणि जिमनॅशिमचे प्रशिक्षण देण्याची ठरावाची सूचना महासभेत मांडली आहे. या ठरावाच्या सूचनेवर सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या महासभेत निर्णय घेण्यात येणार आहे. महासभेने ठराव मंजूर केल्यानंतर प्रशासन त्यावर अंतिम निर्णय घेईल. राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी महिलांना रिक्षाचे परमिट देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी रिक्षा चालवताना महिला दिसत आहेत.

मोठी बातमी : आठवड्यात दुसऱ्यांदा शिवसेनेने दुसऱ्यांदा केलं मोदी सरकारच्या विधेयकांचे स्वागत

कुकिंगचेही मिळणार प्रशिक्षण : 

महिलांना कुकिंगचेही प्रशिक्षण मिळण्याची शक्यता आहे. तशी ठरावाची सूचना भाजपच्या लीना पटेल यांनी मांडली आहे. या ठरावाच्या सूचनेवरही या महिन्यात होणाऱ्या महासभेत निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईत अनेक खानावळी महिला चालवतात. तर घरगुती जेवणांची विक्री करण्याच्या व्यवसायातही महिला मोठ्या प्रमाणात आहे. महिलांना कुकिंगबद्दल प्रशिक्षण मिळाल्यास त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील, असा दावा पटेल यांनी केला आहे.

( संकलन - सुमित बागुल ) 

training of auto and yoga to women proposal in bruhanmumbai municipal corporation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: training of auto and yoga to women proposal in bruhanmumbai municipal corporation