esakal | मुंबईत प्रवास कोंडी सुरुच, सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत प्रवास कोंडी सुरुच, सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी

अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मुंबईतील प्रवास कोंडीचा त्रास वाढायला लागला आहे. बस स्थानकावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसताहेत.

मुंबईत प्रवास कोंडी सुरुच, सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबईः अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मुंबईतील प्रवास कोंडीचा त्रास वाढायला लागला आहे. बस स्थानकावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसताहेत. बेस्टच्या दिमतीला एसटी बसेसची संख्याही वाढवली आहे. सरकारने हॉटेल, रेस्टारेंट ते इतर उद्योगांना सुरु करण्याची मुभा दिल्यामुळे प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. बस प्रवासात प्रवाशांचे सहा सहा तास वाया जातातचं, शिवाय अनेकांना नाईलाजाने खासगी वाहनांचा पर्याय स्विकारावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा जाच कमी करण्यासाठी आता तरी लोकल सेवा सुरु कर अशी विनंती केली आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणावरुन घेतलेला आढावा 

मंत्रालय ते कल्याण ST प्रवास साडेचार तासांचा , प्रवाशांच्या सहनशीलतेचा होतोय अंत

स्थळ- मंत्रालय बस डेपो

या ठिकाणी बससाठी रांगेत तिष्टत राहणाऱ्या प्रवाशांचा संतापाचा कडेलोट झाला कतारण 3.20 वाजताची बस 4.30 ला आली. त्यात एकाने रांग सोडून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण हाणामारीवर आले. प्रवाशांचा सर्व संताप बस वाहकांवर निघाला. ऐरवी असा प्रसंग या बस डेपोच क्वचितच येतो. सायंकाळच्या वेळेला मंत्रालय डेपोमध्ये घरी जाण्यासाठी रांगा लागण्याचे चित्र आता कॉमन झाले आहे.
 
बोरीवलीत राहणाऱ्या  विमल जाधव या विमा आस्थापनेत एडमिन म्हणून कामाला आहेत. दररोज दिड ते दोन तास रांगेत उभ राहल्यानंतर त्यांना बस मिळते. परतीच्या प्रवासाचा वेळ पकडता, त्यांचे दररोज चार तास प्रवासात जातात. एवढा प्रवासानंतर त्या शारीरिक तसेच मानसिक दृष्टया दमून जातात. सायंकाळच्या वेळेला महिलांसाठी निदान दोन ते तीस जादा बसेस सोडाव्यात, एवढी माफक अपेक्षा त्यांची आहे. 

डोंबिवलीचे मंगेश शिंदे हे मंत्रालय परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. मंत्रालयातून डोबिंवलीसाठी एसटीची सोय आहे. संध्याकाळी चारला निघाल्यानंतर डोंबिवलीला पोहोचण्यासाठी  त्यांना साडेसात ते आठ तास लागतात.आता तरी लोकल सुरु करण्याची विनंती त्यांची आहे.

साडेतीन चार तासांचा जाण्याचा प्रवास रोज एसटीने करावा लागतो. दिवसभर कामानिमित्त बाहेर फिरायचं त्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन रिपोर्ट सबमिट करा, एसटीसाठी दीड-दोन तास उभे राहायचे. आता वैताग आलाय. बस वेळेत येत नाहीत. बसायलाही जागा नाही. 

संजय राऊत, कर्मचारी 

मंत्रालयातून कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, विरार, नालासोपारा, ठाणे, अंबरनाथ, अर्नाळा, शहापूर, पनवेल अशाच जवळपास 150 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. ट्रॅफीक जाममुळे एसटी बसेस वेळेवर पोहोचू शकत नाही. एका बसमध्ये 40 ते 44 प्रवासी भरावे लागतात. काही प्रवाशी त्रागा करतात, चालक, वाहकांना उलट सुलट बोलतात. आम्ही संताप समजू शकतो. मात्र प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची आहे.

मिलिंद पाटील (एस.टी.वाहतूक नियंत्रक)

बेस्ट प्रवाशांचे नाकेनऊ, प्रवासादरम्यान रोजची कसरत
 
स्थळ- वडाळा आगार 

बेस्ट बसेसची संख्या कमी असल्याने वडाळा आगर येथील बस थांब्यावर दिवसेंदिवस प्रवासाची गर्दी वाढत असून या गर्दीमुळे प्रवाशांचे प्रवासादरम्यान नाकेनऊ होत आहे. वडाळा आगरमध्ये सकाळ आणि संध्याकाळी कामाच्या वेळेत बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तासाभरातच बस थांब्यावर साधरण 50 ते 70 प्रवाशांची गर्दी वाढते. प्रत्येकालाच कामावर जाण्याची घाई असल्याने ही बस पकडायचीच असा मानस असतो त्यामुळे अनेकदा बस अडवून प्रवासी चढतात. प्रवासादरम्यान रोजची कसरत करावी लागत आहे.   

शहरात अनेक कार्यालये आता सुरू झाली आहेत.  मात्र प्रवाशांच्या तुलनेत मुबलक बस सेवा नसल्याने मला अंधेरीतील कार्यालय गाठण्यासाठी रोज प्रवासादरम्यान कसरत करावी लागत आहे. बसमधील एकंदरीत गर्दी  पाहता आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुषमा पांचाळ - वडाळा प्रवासी

नोकरी करत असल्याने वडाळा ते माहिम असा रोजचा प्रवास करावा लागतो. रोज होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत बसचे प्रमाण कमी आहे. अनेकदा तासनतास बसची वाट पहावी लागते परिणामी बस स्थानकात प्रवाशांची गर्दी तर वाढतेच त्यात  बसायला जागा ही मिळत नाही. अपुऱ्या बस सेवेत वाढ करावी जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षित अंतर राखून प्रवास करता येईल व कोरोना सारखा आजाराचा फैलाव हॊणार नाही. 

बजरंग देशमुख प्रवासी

गेल्या सहा महिन्यांपासून काम बंद होते; आता सुरू झाले आहे. घराचा उदरनिर्वाहाची जबाबदारी आल्याने कामावर जाणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज़ वडाळा ते वांद्रे असा बसने प्रवास करत असली तरी बस मधील गर्दीमुळे अनेकदा प्रवास करणे गैरसोयी व असह्य होते. काहीवेळा बसची वाट न पाहता खिशाला न परवडणारा दिवसाचा 500 रुपयांचा टॅक्सी प्रवास खर्च करून कार्यालय गाठावे लागते. प्रवासातच पैसे जास्त खर्च होत आहे. लोकलने प्रवास करणे सोयीचे होते. त्यामुळे लोकल सुरू केल्यास बस मधील गर्दी व बस सेवेवरील ताण कमी होईल.

प्रिया जाधव,  प्रवासी


एकतर रेल्वे बंद असल्याने बसने प्रवास करावा लागतो व बसमध्ये भरपूर प्रवासी असल्याने बसमध्ये घेत नाहीत त्यामुळे कामावरती पोहचण्यासाठी उशीर होतो. बस स्थानका मधूनच बस भरून येतात. शासनाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही रेल्वे सुरू करत नसाल तर कुपया बसची संख्या वाढवा.

कृष्णकांत मेटकर, प्रवासी

चेंबूर, विक्रोळीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 
 

स्थळ-  विक्रोळी डेपो 

विक्रोळी, कुर्ला चेंबूर परिसरात बस पकडण्यासाठी गर्दी वाढतचं चालली आहे. विक्रोळी बेस्ट डेपोतून दादर, घाटकोपर, अंधेरी, शिवडी व मुलुंड मार्ग बस धावतात. या डेपोतून बेस्ट बस प्रवाशांच्या वेळेनुसार बेस्ट बस नसल्याने ते रिक्षा, ओला, खाजगी वाहनाचा वापर करीत आहे. एक बस भरली की दुसऱ्या बसची कित्येक वेळ वाट पहावी लागत आहे. यावेळी बस पकडण्याकरिता प्रवाशी सोशल डिस्टन्स चा फज्जा उडवीत असल्याचे दिसून येते.

कामावर उशीर झाला तर मालकाची ओरड खावी लागते. ते अडचणी समजून घेत नाही. बेस्ट बस वेळेवर येत नसल्याने हे ओरडणे मालकाचे खावे लागते.कधी रेल्वे सुरू होतेय याची आतुरतेने वाट पहात आहे. 

अविनाश माने ( विक्रोळी- प्रवासी )

मी चेंबूर ला रहाते बेस्ट बस पकडण्या करिता मी दररोज आंबेडकर उद्यान जवळील डेपोत येते. बेस्ट बस शिवाजी नगर डेपोतून सुटल्यावर चेंबूरला येईपर्यंत भरून येते. त्यामुळे कित्येक वेळ रिकामी बस येई पर्यंत वाट पाहावी लागते. बेस्ट ची वाट पहाण्यात व प्रवासात पूर्ण थकायला होत आहे.सरकारने रेल्वे सुरू करावी तसेच बेस्ट प्रशासने जादा बेस्ट बस सोडाव्यात.

स्वाती कांबळे ( चेंबूर प्रवासी )

एसटी थांबत नसल्याने खाजगी प्रवासाचा पर्याय, खिशाला कात्री

स्थऴ- मानखुर्द

मानखुर्द भागातील अनेजण मुंबई,नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केट, ठाणे-बेलापूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत.मात्र कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे तसेच वेळेचा अपव्ययदेखील त्यामुळे होत असतो.लोकल सेवा बंद असल्यामुळे दिवसभराच्या श्रमानंतर कंटाळवाण्या,खर्चिक प्रवासामुळे त्यांना थकवा जाणवतो. या ठिकाणी  प्रवासी मिळवण्याच्या चढाओढीत खाजगी वाहने, रिक्षा,टॅक्सी थांब्याचा परिसर अडवून ठेवतात.त्यामुळे अनेक बस न थांबता निघून जातात.शेवटी  वैतागून खाजगी वाहनाने वाढीव भाडे देऊन जावे लागते.

मी शिवडी येथील एका कुटुंबाकडे चालक म्हणून नोकरीला आहे.मला दररोज कामावर जावे लागते. मानखुर्द ते शिवडी या प्रवास करतानां खूप त्रास होतो. बराच वेळ बसची वाट पहात थांबावे लागते, बसमध्ये पूर्वीप्रमाणे गर्दी होऊ नये म्हणून बऱ्याच बस न थांबता निघून जातात.त्यामुळे नाईलाजाने टॅक्सीचा पर्याय निवडावा लागतो

प्रितम गौड, चालक

लोकलने होणारा प्रवास स्वस्तात आणि वेळेची बचत करणारा असतो.मी ऐरोली येथे राहतो,  दररोज कामानिमित्त  मानखुर्दला येतो.दोन बस बदलाव्या लागतात, एका बाजूचा प्रवास खर्च होतो पन्नास रुपये. तीनपट पैसे खर्च करून पुर्वीपेक्षा दुप्पट वेळ प्रवासात खर्च होतोय. त्यातही आरोग्याची काळजी कायम करावी लागते.

विकास चौहान

सध्या एसटीने प्रवास कोंडी कमी करण्यासाठी बेस्टच्या दिमतीला 500 बसेस दिल्या आहेत. उर्वरीत 500 बसेस लवकरच मुंबईसाठी चालवण्यात येणार आहे.

(राहुल तोरो, वाहतूक व्यवस्थापक, एसटी महामंडळ यांनी माहिती दिली.)

मुंबईत सध्या बेस्ट बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. 3500 बसेसद्वारे प्रवासी वाहतूक सुरु आहे.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Travel congestion continues Mumbai demand start local for common people