उघड्या गटारांमुळे प्रवास जीवघेणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

वसई-विरारमध्ये नागरिकांची सुरक्षा धोक्‍यात; अपघातानंतरही पालिकेचे दुर्लक्ष

वसई ः नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन येथे काही दिवसांपूर्वी मुलाचा गटारात पडून मृत्यू होऊनही परिसरातील उघड्या गटारांचा प्रश्‍न जैसे थेच आहे. वसई-विरार महापालिका परिसरातील अशा धोकादायक गटारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठिकठिकाणी गटारांवर झाकणे नसल्याने ती उघड्या अवस्थेत असून यामुळे अपघातांची भीती व्यक्त होत आहे. पालिकेने याचे गांभीर्य ओळखून तातडीने गटारांवर झाकणे बसवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. 

वसई-विरार महापालिकेने सांडपाण्याचा निचरा करता यावा, यासाठी गृहसंकुल, बैठ्या घराच्या आजूबाजूला, रस्त्याच्या कडेला गटारे तयार केली; मात्र याची देखभाल करण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. नालासोपारा भागातील रेल्वेस्थानकापासून ते आचोळे मार्ग, मजेठिया रस्ता, संतोष भुवन, मोरगाव, वालीव, धानिवबाग, तुळिंज, ओसवाल नगरी, मनवेल पाडा, वसई पूर्व, नवघर, माणिकपूर, नायगाव परिसर, वसई गाव यांसह वसई-विरार पालिका परिसरातील अनेक भागांत गटारांची दुरवस्था आहे. 

गटारे अर्धवट उघडी, पूर्ण उघडी आहेत. यामुळे पदपथावरून चालताना नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पालिका कररूपाने नागरिकांकडून पैसा घेत असली, तरी त्यामानाने सुविधा देण्यास हात आखडता घेत आहे. पावसाळ्यात गटारे तुडुंब भरून वाहत असल्याने नागरिकांना अंदाज येत नाही आणि अनेकजण उघड्या गटारात तोल जाऊन पडतात. शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अवजड वस्तू घेऊन जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

वसई-विरार महापालिका परिसरातील ज्या ठिकाणी गटारांना झाकणे नाहीत किंवा तुटलेली आहेत, याची माहिती घेत आहे. त्यासाठी नऊ प्रभागांत सर्वेक्षण करून त्याप्रकारे झाकणे बसवण्यात येत आहेत. नागरिकांनीदेखील याबाबत त्वरित माहिती दिल्यास कार्यवाही केली जाईल. गटारांना बंदिस्त केले जाईल. तसेच नवी झाकणे बसवण्यात येतील.
राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, पालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel is life-threatening due to open debris Security risks to citizens in Vasai-Virar