राजभवनातील भूमिगत संग्रहालयाचा खजिना खुला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

गेल्या वर्षी राजभवन येथे आढळलेल्या ब्रिटिशकालीन जुळ्या तोफांची औपचारिक प्रतिष्ठापना "जल विहार' या ऐतिहासिक वास्तूसमोर करण्यात आली असून राष्ट्रपतींच्या हस्ते त्या ठिकाणी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. 

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन 
सकाळ न्यूज नेटवर्क 
मुंबई : 2016 मध्ये राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी उपस्थित होते.

या वेळी राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या "जल भूषण' या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठीदेखील भूमिपूजन तसेच राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासाठी आरक्षित "जल किरण' या नूतनीकृत अतिथीगृहाचेदेखील उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. गेल्या वर्षी राजभवन येथे आढळलेल्या ब्रिटिशकालीन जुळ्या तोफांची औपचारिक प्रतिष्ठापना "जल विहार' या ऐतिहासिक वास्तूसमोर करण्यात आली असून राष्ट्रपतींच्या हस्ते त्या ठिकाणी कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

जवळजवळ 15 हजार चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले असून ते लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करावे लागणार आहे. भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक (Virtual Reality) संग्रहालय तयार केले गेले असून त्याद्वारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. या संग्रहालयातील अन्य कक्षामध्ये राजभवनच्या इतिहासाची झलकही दाखवण्यात येणार आहे. 

भूमिगत बंकर 
तीन वर्षांपूर्वी राज भवनातील हिरवळीखाली भव्य ब्रिटिशकालीन बंकर असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांना आढळले. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बंकरची पाहणी करून त्याचे जतन करण्याचे आदेश दिले होते. अनेक दशके या बंकरची वास्तू बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती. तसेच सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने कमजोर झाली होती. ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच तिचे वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली "जलभूषण' ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे तसेच लोकांना वास्तू पाहण्याची संधी देणे आवश्‍यक होते. या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरविण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The treasures of the underground museum in the Raj Bhavan are open