Special Report: कोव्हिडच्या नावाखाली रुग्णालयांचा गोरखधंदा; मान्यता नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार

सुजित गायकवाड
Sunday, 20 September 2020

कोव्हीडच्या नावावर रुग्णांची लुट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांनी आता लुटीची आणखिन परिसीमा गाठली आहे.

नवी मुंबई : कोव्हीडच्या नावावर रुग्णांची लुट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांनी आता लुटीची आणखिन परिसीमा गाठली आहे. महापालिकेतर्फे कोव्हीडची मान्यता न घेता बिनधास्तपणे कोव्हीड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खाजगी रुग्णालयांचा शहरात सुळसुळाट झाला आहे. यापैकी काही रुग्णालयांनी रुग्णांकडे अव्वाच्या सव्वा बीले आकारल्यामुळे रुग्णांनी राजकीय पक्षांच्या मदतीने पालिकेकडे मदतीसाठी धाव घेतल्यावर संबंधित रुग्णालयांचे बींग फुटले.  

जेएनपीटी बंदरात अडकला हजारो मॅट्रिक टन कांदा; निर्यातदारांना दररोज हजारोंचा फटका

मार्च महिन्यात कोरोनाने शहरात शिरकाव केल्यानंतर सुरूवातीला महापालिकेच्या रुग्णालयांत कोव्हीड रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र त्यानंतर कोव्हीड रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेल्याने सरकारी सुविधा अपुऱ्या पडू नयेत म्हणून शहरातील खाजगी रुग्णालयांनाही कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी महापालिकेने दिली. सद्या 27 खाजगी रुग्णालयांना महापालिकेने कोव्हीड रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेतर्फे खाजगी रुग्णालयांना मान्यता देण्यात येते. रुग्णालयाती डॉक्टर, तंत्रज्ञ आणि यंत्रणांच्या क्षमतेनुसार खाटांची परवानगी ठरली जाते. तसेच संबंधित रुग्णालयाची महात्म फुले जनआरोग्य योजनेकडे नोंदणी आहे की नाही याची शहानिशा केली जाते. मात्र हे सर्व सोपस्कार पार पडल्यास खाजगी रुग्णालयांच्या लुटमारीला चाप बसण्याची शक्यता असते. रुग्णालयांच्या कारभार महापालिकेच्या अधिपत्याखाली येऊन रुग्णांना अव्वाच्या सव्वा बीले आकारता येत नाही. त्यामुळे काही रुग्णालये छुप्या पद्धतीने कोव्हीडचे रुग्ण भरती करून त्यांच्यावर उपचार करून लाखो रूपये वसूल करीत आहेत. 

तर, डान्सबारची छम छम देखील सुरू करणार का? भाजप खासदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला

कसे फुटले बींग
जूईनगर मधील एका व्यक्तीच्या वडीलांना कोव्हीड 19 ची लागण झाली होती. त्याबाबत त्यांनी समाजमाध्यमांवरील एका ग्रुपवर चांगल्या रुग्णालयाबाबत माहिती विचारली असता, एकाने दिलेल्या सल्ल्यानुसार स्वस्तात उपचार होतील म्हणून त्यांनी वाशी सेक्टर 28 मधील एका खाजगी रुग्णालयात वडीलांना दाखल केले. त्याठिकाणी वडीलांवर दोन ते तीन दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती खालावल्याने रुग्णाला महापालिकेच्या रुग्णालयात स्थलांतर करण्यास सांगितले. तसेच रुग्णालयाने तब्बल अडीच लाख रूपये बील रुग्णांच्या नातेवाईकांना दिले. यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी काँग्रेसचे नवी मुंबई प्रवक्ते रविंद्र सावंत यांची भेट घेतली. सावंत यांनी याबाबत महापालिकेकडे तक्रार केल्यावर या रुग्णालयाला कोव्हीड मान्यता नसल्याचे निष्पन्न झाले. 

टाळे ठोको आंदोलन करणार 
नवी मुंबई शहरात बिनधास्तपणे काही खाजगी रुग्णालये मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करीत आहेत. वाशीतील एका रुग्णालयाची तक्रार करायला गेल्यावर त्या रुग्णालयाला मान्यता नसल्याचे समोर आले. शहरात अशा प्रकारची तब्बल 20 ते 25 रुग्णालये आहेत. अशा रुग्णालयांवर पालिकेने कारवाई न केल्यास रुग्णालयांना टाळेठोको आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी दिला आहे. 

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ३ हजार ४०१ पदांसाठी भरती सुरु; महास्वयं संकेतस्थळावरुन सहभागी होण्याचे आवाहन

अशी होतेय लुट 
कोरोनावर सद्या वैद्यकीय क्षेत्रात कोणतेही प्रचलित उपचार पद्धती नाही. त्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या कोव्हीडच्या रुग्णांना ताप आणि सर्दी-खोकळा असल्यास त्यावरील गोळ्या, घसा दुखत असल्यास त्यावरील अँटीबायोटीक्स देऊन बरे केले जाते. अगदी श्वास घ्यायला त्रास होत असेल तर नाकावाटे कृत्रिम ऑक्सिजन दिले जाते. परंतू यातील फरक रुग्णाला कळत नाही. तर जाब विचारायला नातेवाईकांना प्रवेश नसल्यानेमुळे रुग्णालयांचे फावत आहे. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन लावून ठेवून आयसीयू आणि व्हेन्टीलेटरचे दर आकारून अव्वाच्या सव्वा बीले आकारली जातात. 

नोटीसा बजावणार 
महापालिका रुग्णालयात खाजगी रुग्णालयाच्या लुटीची तक्रार करण्यास गेल्यानंतर रुग्णालयाला मान्यता नसल्याचे समोर आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ माजली आहे. अशा रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. तसेच तक्रार प्राप्त झालेल्या चार रुग्णालयांना नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्याची माहिती बांगर यांनी दिली.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment of corona patients without recognition in Navi mumbai