झाडांवरील संक्रांत टळली; प्रत्येक झाडाची पाहणी केल्यानंतरच योग्य तो निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officer Sanjay Jadhav

Dombivali News : झाडांवरील संक्रांत टळली; प्रत्येक झाडाची पाहणी केल्यानंतरच योग्य तो निर्णय

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील 16 रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणचे काम एमएमआरडीए मार्फत करण्यात येत आहे. या रस्ते कामात 110 झाडांचा अडथळा येत असून ती तोडण्याची परवानगी देण्यात यावी याविषयीचा प्रस्ताव संबंधित कंत्राटदाराने एमएमआरडीए कडे सादर केला आहे. रस्ते कामांसाठी 110 झाडांवर घाला घातला जाणार असल्याने येथील नागरिकांनी यास विरोध दर्शविला.

याविषयी वृत्त प्रसारीत होताच वृक्ष प्राधिकरणाचे प्रमुख संजय जाधव यांनी गुरुवारी सकाळी एमआयडीसी परिसरात भेट देत रस्ते कामात बाधित होणाऱ्या झाडांची पाहणी केली. 28 झाडांविषयी प्रस्ताव आम्हास प्राप्त झाला आहे. त्या अर्जाची छाननी केल्यानंतरच प्रत्येक झाडाची पहाणी केली जाईल व त्यानंतरच निर्णय घेतला जाईल अशी हमी यावेळी जाधव यांनी नागरिकांना दिली. अधिकाऱ्यांनी ही हमी दिल्यामुळे झाडांवरील संक्रांत टळली असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील एमआयडीसी निवासी भागातील दोन पदरी व चार पदरी अशा 16 रस्त्यांचे सीमेंट कॉंक्रीटीकरणचे काम एमएमआरडीच्या वतीने करण्यात येणार आहे. रस्ते कामात निवासी भागातील एकूण 110 मोठ्या झाडांचा अडसर येत असल्याने ती तोडावी लागणार असल्याचे ठेकेदार एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड कंपनीने नेमलेले सल्लागार महिमतुरा कन्सल्टंट प्रा. लिमिटेड यांनी सर्व्हे करून तसे स्पष्ट केले आहे.

संबंधित कंपनीने त्या आशयाचे पत्र एमएमआरडीए ला पाठविले आहे. तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे देखील तसा अर्ज केल्याचे समजते आहे. एमआयडीसी निवासी विभागात प्रदूषणाची समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे. यावर उतारा म्हणून येथील नागरिकांनी या परिसरात वृक्ष रोपण करत झाडांना जगविले आहे. छोट्या छोट्या रोपट्यांचे आज मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे.

रस्त्यांच्या कडेला असलेल्या या डेरेदार वृक्षांवर रस्ते कामासाठी कुऱ्हाड चालू शकते असे समजताच येथील जागरुक नागरिकांनी वृक्ष बचावासाठी धाव घेतली आहे. रस्ते कामास विरोध नाही, परंतू एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड करण्यात येऊ नये. जी झाडे रस्ते कामात येतही नाही त्यांचा बचाव व्हावा अशी अपेक्षा असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील यांनी सांगितले होते. याविषयीचे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर वृक्ष प्राधिकरण समितीचे प्रमुख संजय जाधव यांनी अधिकाऱ्यांसह त्वरीत गुरुवारी सकाळी एमआयडीसी निवासी भागातील झाडांची पहाणी केली.

झाडे वाचविण्याचा आमचा कायम प्रयत्न राहील. केवळ दोन ते तीन झाडे रस्त्यात बाधित होत असून त्यांचे पुर्नरोपण कसे करता येईल हे पाहीले जात आहे. वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव आल्यानंतर त्या प्रस्तावाची छानणी केली जाईल. प्रत्येक झाडाची पाहणी करुन त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. जास्तीत जास्त झाडे कशी वाचतील हाच आमचा प्रयत्न असेल असे यावेळी जाधव यांनी नागरिकांना सांगितले. त्यावर नागरिकांनी देखील त्यांना सर्व झाडांची पाहणी करण्याची विनंती केली.

एमएमआरडीएच्या वतीने 16 रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येत आहे. यातील नानासाहेब धर्माधिकारी या मार्गाचे काम कंत्राटदाराकडून हाती घेण्यात आले आहे. या मार्गात एकूण 215 झाडे आहेत. यातील 24 झाडे ही रस्ते कामात अडथळा होत असल्याने ती तोडण्याची परवानगी प्रस्तावात मांडण्यात आली आहे. या रस्त्याचे एका लेनचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम बऱ्यापैकी कंत्राटदाराकडून करण्यात आले आहे.

यामध्ये दोन ते तीन झाडे ही रस्त्याच्या मध्ये आली आहेत. या झाडांच्या आजूबाजूला काही फुटांचे अंतर सोडून कंत्राटदाराने बाकीचे काम पूर्ण केले आहे. रस्ते काम करण्याआधी या झाडांचा निर्णय घेतला न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पर्यावरण प्रेमींनी देखील यावर हरकत घेतली असून किंमान उर्वरीत झाडांची तरी आधी पाहणी करुन योग्य निर्णय घेऊन नंतर रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी पालिका अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमआयडीसीमधील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटीकरणचे काम एमएमआरडीएच्या माध्यातून सुरु झाले आहे. या रस्त्यांवर दुतर्फा मोठ मोठी 30 ते 35 वर्षापूर्वीचे वृक्ष आहेत.

आमच्याकडे दोन प्रस्ताव आले असून यामध्ये 24 व 4 झाडांचा प्रस्ताव आहे. या 28 झाडांचा सर्व्हे आज आम्ही करण्यासाठी आलो आहोत. आमच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जानंतर आम्ही संपूर्ण परिसराची पहाणी करतो. जास्तीत जास्त झाडं कशी वाचविता येतील हा आमचा पहिला प्रयत्न असतो. जी झाडे वाचविता येणे शक्य नाही त्याचा पहिला पर्याय म्हणजे त्याच परिसरात त्याचे पुर्नरोपण कसे करता येईल हे पाहिले जाते. पुर्नरोपण शक्य नसेल अशी झाडे काढण्यासाठीचा प्रस्ताव आम्ही प्रस्तावित करु.

- संजय जाधव, मुख्य उद्यान अधिक्षक, उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग