मुंबई : मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 ची ट्रायल जुलै 2020 मध्ये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 साठी एमएमआरडीए अंतर्गत एकूण 19 एजन्सी काम करत आहेत. त्यामुळे एखाद्या कामासाठी चार-पाच महिने उशीर होणे स्वाभाविक आहे. 2020 मध्ये या दोन्ही मेट्रो सेवा सुरू करण्याचे एमएमआरडीएने जाहीर केले आहे. त्यामुळे थोड्या उशिराच्या फरकाने या सेवा 2020 अखेरीला सुरू होतील, असा विश्‍वास आहे.

- आर. ए. राजीव, आयुक्त, एमएमआरडीए

मुंबई : मुंबई मेट्रो 2 ए (दहिसर ते डी.एन.नगर व्हाया लिंक रोड) आणि मेट्रो 7 (दहिसर ते अंधेरी व्हाया वेस्टर्न एक्‍सप्रेस हायवे) ची 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) येत्या जुलै 2020 मध्ये ट्रायल होणार आहे.

मुंबई मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 चे काम 2019 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर डिसेंबर 2019 पर्यंत ही सेवा सुरू करण्याचा प्राथमिक अंदाज होता. परंतु काही तांत्रिक कारणास्तव मेट्रोचे काम रेंगाळले. आता मात्र, या कामाने वेग घेतला आहे. त्यामुळे 2020 मध्ये या दोन्ही मेट्रो सेवा मुंबईकरांच्या सेवेत देण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे.नोव्हेंबर 2018 मध्ये मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 च्या डब्यांची ऑर्डर देण्यात आली होती. सुमारे 18 महिन्यानंतर या ऑर्डरमधील पहिली ट्रेन मुंबई दाखल होणार आहे. बीईएमएल लिमिटेड या कंपनीला रोलिंग कॉन्ट्रॅक्‍ट देण्यात आले आहे.

मेट्रो 2 ए ची सद्यस्थिती

712 पिलरपैकी 596 पिलरचे बांधकाम पूर्ण
स्टेशनचे 60 टक्के स्ट्रक्‍चरल काम पूर्ण
रेल्वे रुळांचे चारकोप डेपोत काम सुरू
सप्टेंबरपासून रुळ बसविण्यास सुरूवात होईल
18.5 किमीपैकी 14 किमीचे काम पूर्ण
एकूण कामापैकी आतापर्यंत 67 टक्के काम पूर्ण

मेट्रो 7 ची सद्यस्थिती

724 पिलरपैकी 595 पिलरचे बांधकाम पूर्ण
स्टेशनचे 60 टक्के स्ट्रक्‍चरल काम पूर्ण
रेल्वे रुळ उभारणी आणि रेल वेल्डिंगचे काम प्रगतीपथावर
16.5 किमीपैकी 9.5 किमीचे काम पूर्ण
एकूण कामापैकी 70 टक्के काम पूर्ण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trial of Metro 2A and Metro 7 in July 2020