esakal | रावण दहनाच्या कार्यक्रमावरून आदिवासी संघटना एकमेकांच्या विरोधात
sakal

बोलून बातमी शोधा

आदिवासी संघटना

रावण दहनाच्या कार्यक्रमावरून आदिवासी संघटना एकमेकांच्या विरोधात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनोर : दसऱ्याच्या दिवशी होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाच्या आयोजनावरून पालघर जिल्ह्यातील आदिवासी संघटना एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.भुमिसेनेचे काळूराम धोदडे अध्यक्ष असलेल्या आदिवासी एकता परिषदेकडून आदिवासी राजा रावण यांच्या दहनाला विरोध दर्शवत रावण पुजेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि आदिवासी एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष जनाठे यांनी पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज रामाला दैवत मानत असून काही आदिवासी संघटना आदिवासींची दिशाभूल करीत असल्याचे सांगत रावण पुजेला विरोध करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.रावण देव की दैत्य यावादात आदिवासींचे नुकसान होत असल्याची भावना आदिवासी तरुण समाज माध्यमातून व्यक्त करीत आहेत.

रावण हा समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसा आणि ठेवा होता.रावण संगीत तज्ञ, राजनीतीज्ञ, उत्कृष्ट रचनाकार आणि न्यायप्रिय राजा स्त्रियांचा आदरकरता आदी कला गुणांनी संपूर्ण होता. परंतु षडयंत्रकारी आणि वर्णद्वेष करणाऱ्या व्यवस्थेने राजांना बदनाम करण्यात आले आहे. राजा रावणाची तामिळनाडू राज्यात 352 मंदिरे आहेत.सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेश राज्यातील मंदसौर येथे आहे.महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट,छत्तीसगड,मध्यप्रदेश आणि झारखंड राज्यात राजा रावणाची पुजा केली जाते.त्यामुळे राजा रावण आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान आहे. परंतु सत्ताधीश समाज व्यवस्थेने राजा रावणाला कमी लेखण्यासाठी जाळण्याची प्रथा जाणीवपूर्वक निर्माण केल्याचा आरोप केला आहे. रावण दहनामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याने रावण दहन करण्यास पालघर जिल्ह्यात परवानगी देऊ नये,तसेच रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच वाडा तालुक्यातील खडेश्वरीनाका येथे राजा रावणाच्या प्रतिमेचे आदिवासी समाजातर्फे पुजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यात दिवसभरात 2,219 रुग्णांची नोंद

राज्यातील आदिवासी समाजाने रावण दहन करण्यात येऊ नये,अशी मागणी शासनाकडे केली होती.मागणी राज्य शासनाने मान्य करण्यात आली आहे.रावण दहन करणाऱ्या मंडळांवर भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत 153,153 ( अ )295,295 ( अ ) 298 . मुंबई पोलिस ऍक्टच्या कलम 131 , 134 आणि135 नुसार गुन्हे दाखल करण्याचा आदेश पारित करण्यात आल्याचे आदिवासी एकता परिषदेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लंकापती रावणाच्या चांगल्या गुणांबद्दल शंका नसल्याचे सांगत आदिवासी एकता मित्र मंडळाने रावण पूजेस विरोध केला असून रावण पुजेला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे.पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज रामचंद्रांना आपले दैवत मानतो.लग्न समारंभात राम राम म्हणत सुखी संसाराला सुरुवात केली जाते.आदिवासी समाज रामाचे वारस आहेत.समाजात भेद निर्माण करणाऱ्या संघटना रावणाला आदिवासींचा राजा मानने चुकीचे आहे.रामाचा अपमान करणाऱ्या रावणाचे पुजन पालघर जिल्ह्यातही होता कामा नये तसेच रावणाचे पुजन न होता दहनच झाले पाहीजे.अशी भूमिका घेत पालघर जिल्ह्यात रावण पुजा होऊ देऊ नये,अशी विनंती पत्राद्वारे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या कार्यक्रमाला आदिवासी संघटना एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी नेमकी काय परिस्थिती निर्माण होते आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top