महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना शास्त्रीय संगीतातून आदरांजली 

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 2 December 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 'भीमांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 'भीमांजली' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

समितीचे मुख्य समन्वयक सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी 'भीमांजली'चे आयोजन करण्यात येते. यंदा हे ५ वे वर्ष असून ६ डिसेंबररोजी सकाळी ६ वाजता मुंबई (प्रभादेवी) येथील रवींद्र नाट्यमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपण होत असल्याने जगभरातील अनुयायांना पाहता येणार आहे. हा कार्यक्रम आवाज इंडिया, जीबीसी इंडिया आणि धम्मचक्र यासह आणखी काही फेसबुक पेजवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या कार्यक्रमाचा आनंद घरबसल्या घेता येईल.

महत्त्वाची बातमी  अभिनेत्रीचा मास्क काढून शिवसैनिक उर्मिला यांचा योगी आदित्यनाथ यांना "जय महाराष्ट्र"; मातोंडकर ऍक्शन मोडमध्ये

२०१६ साली झालेल्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित विश्वमोहन भट, उस्ताद दिलशाद खान, पंडित भवानी शंकर, पंडित मुकेश जाधव यांच्या स्वप्त स्वरांतून 'भीमांजली' कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर दरवर्षी ६ डिसेंबर रोजी 'भीमांजली'चे आयोजन रवींद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ६ वाजता करण्यात येते. गतवर्षी 'भिमांजली' उपक्रमाचे पाचवे वर्ष होते. त्यावेळी कार्यक्रमात प्रसिद्ध सतार वादक उस्ताद उस्मान खान, प्रसिद्ध बासरी वादक पंडित राकेश चौरासिया, व्हायलिन वादक रितेश तागडे आणि प्रसिद्ध तबला वादक पंडित मुकेश जाधव यांच्या सुरमय स्वप्त स्वरांतून बाबासाहेबांना स्वरांजली अर्पण करण्यात आली होती. 

दरम्यान, भारतीय शास्त्रीय संगीताद्वारे बाबासाहेबांना आदरांजली हा पहिल्यांदाच प्रसिद्ध कलाकारांना सोबत घेऊन डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घडवून आणला. संगीताला जात धर्म नसतो.. तर ते लोकांच्या आंतर मनात जाऊन एक खूप चांगल्या लहरी, विचार निर्माण करतात. म्हणूनच शास्त्रीय संगीताद्वारे आदरांजली देण्याचे काम सुरु केले असल्याचे डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

tribute to dr babasaheb ambedkar through classical music on mahaparinirvandin


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribute to dr babasaheb ambedkar through classical music on mahaparinirvandin