TRP Case: विशेष तपास पथकाकडून 3600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल

अनिश पाटील
Tuesday, 12 January 2021

टीआरपी प्रकरणात आज विशेष तपास पथकाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. 3600 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

मुंबई: टीआरपी प्रकरणात आज विशेष तपास पथकाने पुरवणी आरोपपत्र दाखल केले. रिपब्लिकचे विकास खानचंदानी, रोमिल रामगडीया आणि पार्थो दासगुप्ता यांच्याविरोधात 3600 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
 
या दोषारोपपत्रात प्रिया मुखर्जी, शिवा सुंदरम, शिवेंदो मुलेंदकर आणि रॉबर्ट वॉल्टर आणि रिपब्लिकशी संबंधित आणखी काही जण त्याचबरोबर अमित दवे, संजीव वर्मा आणि महामुव्हीज चॅनेल्सशी इतर काही जणांचा पाहिजे आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आतापर्यंत ओळख पटली नसलेला रॉकी नावाचा आरोपी अजून फरार आहे. 59 जण या आरोप पत्राचे साक्षीदार आहेत. त्याचबरोबर 12 जणांच्या तज्ञांच्या पथकाचे मत या आरोपपत्रात समाविष्ठ करण्यात आली आहेत. याप्रकरणी  जवळपास 50 लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. यामध्ये घड्याळ, सोन्याचे दागिने, मोबाईल्स, लॅपटॉप्स, आणि इतर साहित्य आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आणि व्हाट्सअप चॅटिंगची पडताळणी होणार आहे.

बीएआरसी ही संस्था भारतीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते.  या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास 3 हजार बोरोमिटर्स बसवलेत. त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते. विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्ज नुसार, जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणाऱ्यांना पैसे देतात. टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्या मुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 409, 420, 465, 468, 406, 120(ब), 201, 204, 212 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. आतापर्यंत याप्रकरणी 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने प्रकरणी 1200 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा- भिवंडी: टोरेंट कार्यालयात तोडफोड करणारे मनसेचे 7 कार्यकर्ते अटकेत

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

TRP Case 3 thousand 600 page supplementary chargesheet filed by SIT


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TRP Case 3 thousand 600 page supplementary chargesheet filed by SIT