नवी मुंबईतून २७ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

ऐरोली (१५०) विधानसभा मतदारसंघातून  १५ उमेदवार रिंगणात आहेत; तर बेलापूर (१५१) मतदारसंघातून १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी (ता.४)  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख असल्याने निवडणूक विभागाच्या कार्यालयात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

नवी मुंबई : ऐरोली (१५०) विधानसभा मतदारसंघातून  १५ उमेदवार रिंगणात आहेत; तर बेलापूर (१५१) मतदारसंघातून १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शुक्रवारी (ता.४)  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम तारीख असल्याने निवडणूक विभागाच्या कार्यालयात उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी शनिवारी (ता.५) होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख  ७ ऑक्‍टोबर असणार आहे. अर्ज बाद होण्याच्या भीतीने एकाच उमेदवाराने दुबार अर्ज देखील भरले आहेत. यातून किती उमदेवारांचे अर्ज बाद होणार व किती उमेदवार अर्ज मागे घेणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.  

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यांनतर युती-आघाडी होणार का याची चर्चा सुरू होती; तर युती झाल्यानंतर ऐरोली व बेलापूर मतदारसंघ हे कोणाच्या वाट्याला जाणार याचीच चर्चा सुरू होती. मात्र युती झाल्यांनतर ऐरोली व बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे गेले आहेत. तसेच गणेश नाईक यांनी हातावरचे घड्याळ उतरवत कमळ हाती घेत भाजपमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे शहरात सध्या कभी खुशी कभी गमचे वातावरण आहे.

ऐरोली, बेलापूरमधून यांनी भरले उमेदवारी अर्ज
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून १५ उमेदवार रिंगणात असून भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक, मनसेचे नीलेश बाणखेले, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गणेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश ढोकणे, रिपब्लिकन बहुजन सेनेच्या संगीता टाकळकर, बसपाचे राजेश जयस्वाल; तसेच अपक्ष उमेदवार म्हणून सागर नाईक यांनी अर्ज भरला आहे. तर बेलापूर विधानसभा संघातून एकूण १२ उमेदवार रिंगणात असून भाजप-शिवसेना महायुतीच्या मंदा म्हात्रे, मनसेचे गजानन काळे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे अशोक गावडे; तर अपक्ष म्हणून विजय माने यांनी अर्ज भरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty seven candidates from Navi Mumbai for assembly election