तब्बल सहा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर सयामी जुळ्या मुली अलग; दोघींची प्रकृती स्थिर

भाग्यश्री भुवड
Thursday, 28 January 2021

परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींना सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे अलग करण्यात डॉक्‍टरांच्या पथकाला यश आले. या जुळ्या मुली छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या अवस्थेत होत्या.

मुंबई  : परळच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात जन्माला आलेल्या सयामी जुळ्या मुलींना सहा तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे अलग करण्यात डॉक्‍टरांच्या पथकाला यश आले. या जुळ्या मुली छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या अवस्थेत होत्या. अशा जुळ्यांना विभक्त करणारी वाडिया रुग्णालयातील ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. जन्मल्यानंतर या दोन्ही बाळांचे एकत्रितरीत्या वजन 4.2 किलोग्रॅम इतके होते. त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना विभक्त करणे आवश्‍यक होते. 

या सयामी जुळ्या मुलींना नवजात शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. या बाळांचे यकृत, छातीखालचा भाग तसेच आतडे एकत्र जुळलेल्या अवस्थेत होते. बालरोगतज्ज्ञ, नवजात शिशुतज्ज्ञ भूलतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, थोरॅसिक सर्जन आणि प्लास्टिक सर्जनच्या पथकाने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. हार्मोनिक स्कॅल्पेल आणि टी सीलचा वापर करून यकृत वेगळे करण्यात आले. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

अशा ओम्फालोपॅग्ज जुळ्या जोड्या सर्व जुळ्या जोड्यांपैकी 10 टक्के पाहायला मिळतात. वाडिया रुग्णालयात यशस्वीरीत्या जन्मलेल्या जुळ्यांमधील ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. सयामी जुळ्यांचा यशस्वी दर हा जवळपास 50 टक्के आहे. अचूक मूल्यांकन आणि व्यवस्थापनाच्या जोरावर 100 टक्के यश मिळू शकले. बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात जन्मलेल्या या जुळ्या मुलांवर आव्हानात्मक शस्त्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे या बाळांना सामान्य आयुष्य लाभले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. 

शस्त्रक्रिया मोफत 
रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया मोफत केली आहे. आमच्यावर आर्थिक भार येऊ दिला नाही. शस्त्रक्रियेनंतर विभक्त झाल्यावर आम्हाला कोणतीही समस्या आली नाही आणि सामान्य मुलांप्रमाणे आम्ही त्यांची काळजी घेत आहोत, अशी प्रतिक्रिया या बाळांच्या पालकांनी दिली. 

 

( संपादन - तुषार सोनवणे )

 

twin girls separated after six hours of surgery Bai Jerbai Wadia in mumbai 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twin girls separated after six hours of surgery Bai Jerbai Wadia in mumbai