
नवी मुंबई: समुपदेशनाद्वारे २१६ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळले; पोलिसांची माहिती
नवी मुंबई : धावपळीची जीवन, स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याचे आव्हान, तडजोडीचा अभाव आणि जोडीदाराला पुरेसा वेळ देता न येणे आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षांत गृहक्लेशाचे प्रमाण वाढले आहे. हळूहळू हे वाद विकोपाला जाऊन घटस्फोटापर्यंत (Divorce cases) येतात. मात्र वेळीच त्यांचे समुपदेशन (counselling) केल्यास संसार वाचू शकतो, हे नवी मुंबई पोलिसांच्या (Navi Mumbai Police) महिला साहाय्य कक्षाने दाखवून दिले आहे. समुपदेशन केल्याने २०२१ या वर्षात २१६ जोडप्यांचे उधळले जाणारे संसार पुन्हा जुळविण्यात कक्षाला यश आले आहे.
हेही वाचा: ''ED च्या नावाने केंद्रीय मंत्र्यांना धमकी देणं शोभतं का?''
संशय, मोबाईलचा वापर, व्यसन, पाश्चिमात्य संस्कृती, पैशांची मागणी, शारीरीक व मानसिक त्रास अशा विविध कारणांमुळे विवाहित जोडप्यांमध्ये कौटुंबिक वाद निर्माण होतात आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. मात्र याचे परिणाम जोडप्यांसह लहान मुलांनाही भोगावे लागतात. तर काहीवेळ वाद किरकोळ असतात मात्र रागाच्या भरात टोकाचे निर्णय घेतले जातात. महिला साहाय्य कक्षाकडून अशा जोडप्याचे समुपदेशन करण्यात येते. पतीपत्नीला एकत्र बोलावून त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. वादाची कारणे, ती टाळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत समजावले जाते. अनेकदा यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेतली जाते.
महिला साहाय्य कक्षाकडे वर्षभरात एकूण १०३८ अर्ज दाखल झाले होते. यापैकी २१६ प्रकरणांमध्ये महिला साहाय्य कक्षाने जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा जुळविले आहेत. तर काही महिला पीडितांना त्यांच्या अधिकाराची माहिती देवून न्यायालयात दाद मागण्यासाठी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाअंतर्गत मदत केली आहे. तसेच काही महिलांना पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याकरिता शिफारस पत्र देण्यात आले आहे.
२०२१ मध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यात १९१ गुन्हे दाखल झाले आहेत. खास महिलांच्या मदतीसाठी असलेल्या नवी मुंबई पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षाकडून कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीत विविध प्रकारे समुपदेशन व साहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- बिपिन कुमार सिंह, पोलीस आयुक्त
Web Title: Two Hundred And Sixteen Couple Reunite After Counselling Says Navi Mumbai Police Divorce Cases Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..