उल्हासनगर महानगरपालिकेतील पीआरओ युवराज भदाणे निलंबित !
उल्हासनगर : मूळ जन्मतारीख ही 1 जून 1970 असताना उल्हासनगर महानगरपालिकेत नोकरी मिळवण्यासाठी जन्म दाखल्यात 1 जून 1972 अशी फेरफार करून शासनाची व पालिकेची 420 अंतर्गत फसवणूक केल्याप्रकरणी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.याप्रकरणी आज पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांनी भदाणे यांना निलंबित केल्याची माहिती पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.याबाबत उद्या मंगळवारी भदाणे यांच्या निलंबनाची ऑर्डर निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Ulhasnagar Municipal Corporation PRO Yuvraj Bhadane suspended)
अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी युवराज भदाणे यांनी त्यांच्या मूळ जन्म तारखेत फेरफार करून पालिकेत नोकरी मिळवल्याची तक्रार पुराव्यानिशी पालिकेकडे केली होती.त्यानुसार आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांच्या निर्देशानुसार भदाणे यांच्या सेवा पुस्तकात नोंदवलेली 1 जून 1972 ही जन्मतारीख कोणत्या आधारावरून नोंदवली गेली त्याची सत्यता पडताळणी करण्याबाबत मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या सह चार सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती.समितीने 27 ऑक्टोबर 2021 रोजी आपला अहवाल आयुक्तांकडे सादर केला होता.त्यात प्राथमिक,माध्यमिक आणि महाविद्यालयीन शैक्षणिक संस्थांच्या अभिलेखात भदाणे यांची जन्म तारीख ही 1 जून 1970 ही नोंद आहे.असे असताना शाळा सोडल्याचा दाखला महात्मा गांधी शाळेचा दर्शवून आर.के.तलरेजा महाविद्यालयामार्फत त्यात फेरफार करून चुकीची 1 जून 1972 अशी जन्मतारीख नमूद करून वयोमर्यादित बसत असल्याचे दर्शवून महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका समितीने ठेवला होता.
त्यामुळे युवराज भदाणे यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा शासकीय प्रस्ताव मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी महासभे समोर ठेवला होता.तो मंजूर करण्यात आल्याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सामान्य प्रशासनाचे सहायक आयुक्त अच्युत सासे यांनी दिलेल्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर जन्म तारखेचा खोटा दाखला बनवून तो खरा आहे असे भासवून आणि उल्हासनगर महानगरपालिकेत सदरचा दाखला सादर करून त्याद्वारे नोकरी मिळवून सन 2003 पासून महानगरपालिकेचे वेतन व विविध लाभ घेऊन शासन व पालिकेची फसवणूक केली.अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पालिकेला आपण वैद्यकीय रजेवर जात असल्याचा ईमेल करणारे भदाणे हे अद्यापही मध्यवर्ती पोलिसांना सापडले नाहीत.त्यांनी या फसवेगिरीच्या गुन्ह्यात कल्याण न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.तो फेटाळण्यात आल्याची न्यायालयाची ऑर्डर पालिकेला मिळाल्यावर आयुक्त डॉ.दयानिधी यांनी भदाणे यांना निलंबित केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.