गुंतवणूकदारांसाठी उलवा स्वर्ग

अर्चना राणे-बागवान 
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे येथील घरांना सोन्याचा भाव मिळण्याचा विश्‍वास असल्याने ही वसाहत लाडकी ठरत आहे.

नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे येथील घरांना सोन्याचा भाव मिळण्याचा विश्‍वास असल्याने ही वसाहत लाडकी ठरत आहे.

उलव्यात रस्ते, पदपथ, मैदाने, उद्याने, स्वच्छतागृह यांसारख्या पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्याशिवाय खरेदी, विरंगुळ्यासाठी उद्यानेही नाहीत. मॉल, चांगली हॉटेल्स नसल्याने येथील रहिवाशांना सध्या शेजारचे सीवूडस्‌ किंवा बेलापूर गाठावे लागते; मात्र या वसाहतीजवळचे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ, सागरी सेतू, सीवूडस्‌-उलवे लिंक रोड आणि विशेष आर्थिक क्षेत्रामुळे होणारा विकास यामुळे येथील घरांचा भाव वधारत आहे. 

उलव्यातील घरांना भविष्यात मिळणाऱ्या दामदुप्पट नफ्याची शक्‍यता आहे. या भागात सुमारे ३ हजार २८४ पेक्षा अधिक इमारती उभ्या राहत आहेत. काहींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 

वसाहतीत लोकल सुरू होऊन महिना होत आला असला तरी येथील गुंतवणूक मागील सहा महिन्यांपासून वाढत आहे, अशी माहिती बालाजी इन्फ्राच्या राज चौधरी यांनी दिली. 

वसाहतीत प्रतिचौरस फुटासाठी सहा हजारांचा दर आहे. टॉवरमध्ये १० ते १२ हजारांपर्यंतचा भाव आहे. १ बीएचकेसाठी चार ते सहा हजारांचे भाडे आहे. नेरूळ-खारकोपर लोकल सुरू होण्यापूर्वी इतक्‍याच जागेसाठी लोकांना दोन ते तीन हजार भाडे होते. त्यामुळे उलव्याचे महत्त्व अधोरेखीत होत आहे.

नवी मुंबईत उलवा या एकमेव ठिकाणी गुंतवणुकीसाठी पसंती आहे. पाच ते सहा हजार चौरस फूट दराने उपलब्ध असलेली घरे तीन ते चार वर्षांत १२ ते १५ हजार दराने मिळतील. वर्षभराने या भागात लोकल गाड्यांची संख्या वाढेल. वाहतुकीचे इतर पर्यायही उपलब्ध होतील. साहजिकच इथले दर वाढणार. भविष्याचा विचार करणाऱ्यांसाठी वसाहत फायदेशीर ठरणारीच आहे. 
- भरत जाधव, व्यवस्थापकीय संचालक, आदित्य लॅंड अँड इन्फ्रा

लोकल झाल्यानंतर उलव्यातील घरांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या उलव्यातील घरे परवडण्यासारखी आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्‍क्‍यांनी येथील घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. २०१९ मध्ये इतकीच वाढ अपेक्षित आहे.
- हरीश छेडा, अध्यक्ष, बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई

उलव्यात घर घेताना गुंतवणुकीचाच विचार केला होता. लोकल सुरू झाल्यामुळे घरांचे दर वाढले आहेत. विमानतळ, सागरी सेतू सुरू झाल्यावर दर आणखी वाढतील. त्यामुळे भविष्यात मला हे घर विकायचे झाल्यास घराला चढा भाव मिळणार हे नक्की.
- राजेश कदम, रहिवासी, उलवे

Web Title: Ulva Paradise for investors