अलिबाग : तालुक्यातील उमटे धरणातून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्याचा फटका तब्बल 60 गावांना बसत आहे. या प्रश्नावर जिल्हा परिषदेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेतही तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अलिबाग तालुक्यातील सुडकोली, कुदेपासून रामराज, तळवली, उमटे, बोरघर, महाजने, बेलोशी, वावे आदी 60 गावांना पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 1984 मध्ये उमटे येथे धरण बांधण्यात आले होते. या धरणाजवळ जल शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. त्यासाठी एक कोटी 20 लाख रुपयांचा निधी खर्च करूनही अजूनही शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तर मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कावीळ, अतिसारसारखे आजार होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही या प्रश्नावर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतरही हा प्रश्न कायम आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या धरणावर अवलंबून असलेल्या गावातील नागरिकांना पाणी उकळून प्या, गाळून प्या, असे आवाहन केले आहे.
उमटे येथील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी जल शुद्धीकरणाचे केंद्र सुरू केले आहे. त्याद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे धरणात दरड कोसळल्याने गढूळ पाणी येत असावे. पाऊस कमी झाल्यावर शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
- राजेंद्र कोळी, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा
दूषित पाण्यामुळे कावीळ, अतिसार, उलटी, विषमज्वर यांसारखे जलजन्य आजार होतात. पावसाळ्यात अशा प्रकारचे आजार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.
- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी
उमटे धरणावर लाखोंचा खर्च करूनही गढूळ, दूषित पाणीपुरवठा होतो. याबाबत जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि पालकमंत्री यांना निवेदन दिले आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसेल तर राज्यकर्ते नक्की करतात तरी काय, असा प्रश्न आहे. पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अभियंत्यांबरोबरच कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावेत.
- राजाराम पाटील, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी
|
|